पुणे: पुणे शहरात मानवता आणि सामाजिक ऐक्याचे एक अनोखे उदाहरण समोर आले आहे. येथील जावेद खान यांनी एका वृद्ध ब्राम्हण व्यक्तीवर हिंदू रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या घटनेने धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश दिला असून, जावेद खान यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत जावेद खान?
जावेद खान हे सामाजिक कार्य आणि जनसेवेसाठी नेहमीच अग्रेसर असतात. स्थानिक स्तरावर त्यांची ओळख एक संवेदनशील आणि मदतीला धावून जाणारा व्यक्ती अशी आहे. त्यांनी अनेकदा सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन गरजूंना मदत केली आहे. मात्र, त्यांच्या या ताज्या कृतीने ते अधिक प्रकाशझोतात आले आहेत.
हे ही वाचा>> हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्याच्या जावेद खान यांना थेट उद्धव ठाकरेंचा फोन म्हणाले, 'तुम्हाला तर...'
नेमकी घटना काय?
काल (28 मार्च) पुण्यातील एका वृद्ध ब्राम्हण व्यक्तीचा मृत्यू झाला. सुधीर किंकळे असं त्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे, परंतु त्यांची बहीण सोडता त्यांचे इतर कोणतेही कुटुंबीय त्यांच्या जवळ नव्हते. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत जावेद खान यांना त्यांचे मित्र मायकल साठे यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर जावेद यांनी याबाबत तात्काळ पुढाकार घेतला.
त्यांनी स्थानिक लोकांशी संपर्क साधून हिंदू रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था केली. यामध्ये अग्निसंस्कारापासून ते इतर विधींपर्यंत सर्व काही गोष्टींची तजवीज केली. विशेष म्हणजे, जावेद खान हे स्वत: मुस्लिम असूनही त्यांनी धार्मिक भेदभाव बाजूला ठेवत ही जबाबदारी पार पाडली.
उद्धव ठाकरेंकडून कौतुक
जावेद खान यांच्या या कार्याची दखल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या या कृतीचे तोंडभरून कौतुक केले.
हे ही वाचा>> Mumbai Pune Expressway वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासायक बातमी! MSRDC ने 2030 पर्यंत...
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये जावेद खान यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे. "धर्म आणि जात यापलीकडे जाऊन त्यांनी जो संदेश दिला, तो आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे," असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
जावेद खान काय म्हणाले?
या संदर्भात जावेद खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, "माझ्यासाठी माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. त्या वृद्ध व्यक्तीला कोणीही नव्हते, म्हणून मी पुढे आलो. हिंदू रीतिरिवाजांचा आदर करत मी हे काम केले. मला यातून काही वेगळे साधायचे नव्हते, फक्त एक माणूस म्हणून माझे कर्तव्य पार पाडले." त्यांच्या या साध्या आणि प्रामाणिक उत्तराने अनेकांचे मन जिंकले आहे.
जावेद खान यांनी घेतलेला हा पुढाकार आजच्या विभाजनाच्या काळात एक आशेचा किरण ठरला आहे. त्यांच्या या कृतीने समाजाला एकत्र आणण्याचा आणि परस्परांबद्दल संवेदनशील राहण्याचा संदेश दिला आहे. पुणे शहरातील ही घटना केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे.
ADVERTISEMENT
