-कुवरचंद मंडले, नांदेड
शिवसेनेचे नेते आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मोठं भाकित केलं आहे. संजय शिरसाट यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते लवकरच ठाकरे गटात जातील, असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं. (Congress leader Ashok Chavan said Sanjay Shirsat will be joined Uddhav Thackeray’s shiv sena, he have no options)
ADVERTISEMENT
नांदेड येथे मुंबई Tak शी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले. छत्रपती संभाजीनगर इथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेनंतर सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोमूत्र शिंपपडून मैदानाचे शुद्धीकरण केलं. या घटनेवर बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, “राजकारणात अतिशय खालच्या स्तरावर जाऊन हे जे सुरू आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. सभेचे ठिकाण हे सार्वजनिक ठिकाण असून, कुणालाही तिथे सभा घेता येतात. कुणालाही सभा घेण्यापासून रोखलेले नाही. तुमच्या झाल्यावर आम्ही तसं करायचं का? तुम्ही सभा घ्या, विचार मांडा पण, गोमूत्र शिंपडण्याचा प्रकार लोकांना आवडणारा नाही”, असे चव्हाण म्हणाले.
जे केलं ते समर्थनीय आहे का? अशोक चव्हाणांचा चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल
‘उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला म्हणून आम्ही बदला घेतला’, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली. “राजकारणात बदल्याची भाषा कुणी वापरू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रात बदलाच्या राजकारणापेक्षा लोकशाही मार्गाने… पक्षांतर बंदी कायदा देशात आहे. त्यासोबतच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना काही नीतिमूल्ये असतात. तुम्ही जे केलंय ते समर्थनीय आहे का? असा माझा बावनकुळेंना सवाल आहे”, असं चव्हाण यावेळी म्हणाले.
संजय शिरसाट यांच्याबद्दल अशोक चव्हाणांनी नेमके काय भाकित केले?
शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीपूर्वी (2024) भाजपात जाणार, असं म्हटलं होतं. याबद्दल अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा – देवेंद्रजी, आपल्या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण…; संजय राऊतांच पत्र
अशोक चव्हाण यांनी संजय शिरसाट यांच्या विधानावर त्यांची भूमिका मांडली. त्याचबरोबर शिरसाट यांच्याबद्दल भाकित केलं. “शिरसाट भविष्यकार आहेत का? खरं म्हणजे शिरसाटांच्या कोणत्याही वक्तव्याची फार दखल घ्यायची गरज मला वाटत नाही. दुसरा मुद्दा असा की, त्यांना मंत्रिमंडळात घेत नाही, हे निश्चित झालं आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतच नाहीये. त्यामुळे त्यांना (संजय शिरसाट) आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही. ते लवकरच जातील, असं माझं भाकित आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
ADVERTISEMENT