Hingoli : “सर, देवाचा नंबर द्या, माझ्या बाबाला घरी पाठवा”, चिमुकलीचं CM शिंदेंना ह्रदयद्रावक पत्र

भागवत हिरेकर

• 09:56 AM • 27 Oct 2023

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या शेगाव खोडके गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. दिवाळी आली आहे, माझ्या वडिलांना देवाला सांगून घरी पाठवा, अशी विनंती केली आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

-ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली

हे वाचलं का?

Hingoli latest Marathi News : ‘आईचं आणि बाबाचं भांडण झालं. त्यानंतर बाबा घरी आलाच नाही. आजीला विचारलं, तर ती म्हणते देवा घरी गेला. सर, देवाचं घर कुठंय. त्याचा नंबर द्या. आई सारखी रडते. माझ्या बाबाला घरी पाठवा. त्याला म्हणा दीदी रडतेय, ते लवकर येतात”, हे काळीज पिळवटून टाकणारे शब्द आहेत. एका शेतकऱ्यांच्या मुलीचे. अशी मुलगी जिला अजून वडिलांनी आत्महत्या केली म्हणजे काय केलंय, हेही उमगलेलं नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. तिने तिच्या व्यथा आणि वेदना कागदावर उतरवल्या, ज्या वाचून अवघा महाराष्ट्र हळहळला. (Suicide farmer’s daughter write letter to cm eknath shinde)

हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके (ता. सेनगाव) गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. नारायण खोडके यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केली. त्यांच्या आठवीत शिकत असलेल्या किरण खोडके या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र’-मनोज जरांगे पाटील

आत्महत्या केलेल्या शेतकरी नारायण खोडके यांचं कुटुंब.

 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र

एकनाथ शिंदे सर
महाराष्ट्र मुंबई,

सर, तुमचा दसरा चांगला गेला असण अन् तुमची दिवाळी पण चांगली जाईन पण आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही. आई रडत असते. सारखी म्हणते भाव असते तर तुव्हा बाबा मेला नसता. वावरात सोयाबीन कमी झालं. आई न बाबा भांडण केली आणि आमचा बाबा पुन्हा आला नाही.

आजीले विचारलं त म्हणते देवा घरी गेला. सर, देवाचं घर कुठं आहे. त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाले पाठवा लवकर दिवाळी येणार आहे. आमच्या घरी दोन दिदी, मी आणि दादा आहोत. रोज बाबाची वाट पाहतो पण ते नाही येत. मग आम्हाला दिवाळीला रिसोड बाजारात कोण नेईल. कपडे कोण आणल. तुमचे बाबा गेले बाहेर की दिवाळी होते का तुमची. तुम्हाला बाजारला कोण नेते.

हे ही वाचा >> Manoj Jarange : ‘जरांगेला अटक करा, मुसक्या…’, सदावर्ते फडणवीसांचं नाव घेऊन काय बोलले?

लोक म्हणतात सरकारमुळे तुव्हा बाप देवा घरी गेला, हे खर हाय का? देवाले सांगून बाबाला पाठवा. आम्हाला दिवाळी बाजार आणायचा आहे. बाबाला म्हणावं तुमची दिदी रडायली मग येतात लवकर.

    follow whatsapp