वीर सावरकर जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईत वांद्रे वर्सोवा समुद्र सेतूचं काम सुरू आहे. या समुद्र सेतूला सावरकरांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
ADVERTISEMENT
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या देशाचं, या राज्याचं आणि या मातीचं सुदैव आहे की, सावरकरांसारखा जहाल देशभक्त जन्माला आला. परंतु दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूला 57 वर्षे झाली, तरी अनेकांना सावरकर कळले नाहीत. आंदमानच्या तुरूंगात ब्रिटिशांनी त्यांचा अतोनात छळ केला. काही लोक त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न करतात, तेही दुर्दैवी आहे. चीड आणणारे आहे.”
एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना चिमटे
“आज देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाली आणि सावरकर आपल्यातून जाऊन 57 वर्ष लोटली तरीसुद्धा सावरकरांची दहशत आणि भीती अनेक लोकांच्या मनात आजही तशीच आहे. म्हणून ते वारंवार त्यांच्याबद्दल चुकीची माहिती, जाणीवपूर्वक काही वक्तव्ये करतात”, असं टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला.
…म्हणून विरोधकांकडून खटाटोप -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सावरकर आणि त्यांचे हिंदुत्ववादी विचार जर लोकप्रिय झाले तर आपला बाजार कायमचा उठेल, अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून तो हा खटाटोप करताहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिभावंत साहित्यिक होते, कवी होते. भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी त्यांनी इंग्रजीला अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. ते आपण वापरतो.”
हेही वाचा >> Mangesh Chavan : “एकनाथ खडसे म्हणजे विकृती, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पनवती”
“सरकारने स्वातंत्र्यवीर गौरव दिन करण्याचा निर्णय घेतला. हा कायम सातत्याने रुजवण्याची आवश्यकता आहे. सावरकर म्हणायचे की हिंदू धर्म नाही, तर जीवन प्रणाली आहे. देश प्रथम हा विचार त्यांनी मांडला. ते म्हणायचे की, जर्मनांचा देश जर्मनी, इंग्रजांचा देश इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्तान, अफगाण्यांचा अफगाणिस्तान मग हिंदूंचा देश हिंदुस्थान या नावाने ओळखला गेला पाहिजे”, असं शिंदे यांनी कार्यक्रमात सांगितलं.
हेही वाचा >> ‘सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवला’, नव्या वादाला फुटलं तोंड
“शासनाच्या माध्यमातून जो समुद्र सेतू आपण बांधत आहोत, वांद्रे-वर्सोवा त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सोवा समुद्र सेतू हे नाव देण्याचा निर्णय घेऊया. त्यांच्या नावाने केंद्र सरकार, राज्य सरकार शौर्य पुरस्कार वितरित करते, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार राज्य सरकार सुरू करेल, असा निर्णय घेऊया,” अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
ADVERTISEMENT