Farmers Protest News Live : मोदी सरकारसोबत चार वेळा बैठक होऊनही शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी इरेला पेटले आहेत. शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी 14 हजार शेतकरी 1200 ट्रॅक्टरसह पुढे जाण्याचा प्रयत्न करत असून, या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी सीमेवर विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबच्या डीजीपीने एडीजी, आयजीपी आणि सर्व रेंजच्या डीआयजींना पत्र लिहून पोकलेन, जेसीबी, टिप्पर आणि हायड्रा सारख्या अवजड वाहनांना पंजाब-हरियाणाच्या खनौरी आणि शंभू सीमेकडे कोणत्याही परिस्थितीत जाऊ देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. दिल्लीच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे... या आंदोलनाचे ताजे अपडेट्स वाचा...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 05:38 PM • 21 Feb 2024आंदोलनस्थळी जेसीबी, पोकलेन आणू नका, हरियाणा पोलिसांचं आवाहन
हरियाणा पोलिसांकडून आंदोलनातील शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून कायदा हातात घेऊ नका आणि कलम 144 चे उल्लंघन करू नका असंही आवाहन करण्यात आले आहे. आंदोलकांनी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. त्यानुसार रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वाहतुकीचे साधन म्हणून वापर करणे हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असल्याच्या सूचना पोलिसांनी दिला आहे. त्याचबरोबर जेसीबी, पोकलेनसह अवजड यंत्रं आंदोलनस्थळी आणू नका असंही आवाहन करण्यात आले आहे.
- 05:31 PM • 21 Feb 2024संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख आणि युवा आंदोलकांमध्ये वाद
संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख जगजित सिंग डल्लेवाल आणि तरुण आंदोलकांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. युवा आंदोलक शेतकरी नेत्यांकडे सीमा ओलांडून पुढे जाण्याची परवानगी मागत होते, मात्र डल्लेवाल यांनी सांगितले की, आम्हाला तरुणांचे जीव घ्यायचे नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना पुढं पाठवू शकत नाही. मात्र यावेळी युवा आंदोलकांनी थेट त्यांच्यासोबत वाद घातला आहे.
- 03:17 PM • 21 Feb 2024शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी बंठिंडा जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याचा मृत्यू
शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी खनौरी संगरूरमध्ये एक युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृत झालेला युवक हा भंटिंडा जिल्ह्यातील रहिवासी असून आंदोलनावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आंदोलनावेळी जखमी झालेल्या युवकाला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना वाहनातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
- 02:08 PM • 21 Feb 2024दिल्लीच्या पूर्वेकडील चिल्ला बॉर्डर, भोपरा आणि अप्सरा बॉर्डरवर वाहतूक सुरळीत
दिल्ली ईस्टर्न रेंजचे अतिरिक्त सीपी सागर सिंग कलसी यांनी सांगितेल की, आम्ही गाझीपूर सीमेवर असून उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांतील पोलिसांबरोबर आम्ही समन्वय साधत आहोत. गाझियाबाद आणि नोएडा परिसरातून अजून कोणतीही माहिती मिळाली नसून बॉर्डरजवळ शांतता राखणे हेच आमचे पहिले प्रथम कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या दिल्लीच्या सर्व प्रमुख पूर्वेकडील सीमेवर - चिल्ला बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर, राष्ट्रीय महामार्ग 9, भोपरा बॉर्डर, अप्सरा बॉर्डर आणि मीत नगरमधील वाहतूक सुरळीत आहे.
- 02:03 PM • 21 Feb 2024आंदोलनातील 3 हजार शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
हरियाणा सीमेपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या संगरूरच्या खनौरीमध्ये 3000 शेतकऱ्यांना अडवण्यात आले आहे. त्यांचे आंदोलन परतवून लावण्यासाठी हरियाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नलकांड्या फोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
- 01:31 PM • 21 Feb 2024Manoj Jarange : "आता कुणी विरोध करणारे नाही राहिले", जरांगेंचा नवा प्रस्ताव
आता उपोषण करायचं नाही, अशी विनंती उपस्थितांनी मनोज जरांगे पाटील यांना बैठकीत केली.
नंतर जरांगे म्हणाले, "साडेसहा कोटी मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. आपल्या नोंदी ओबीसी आरक्षणाच्या निघाल्या. ओबीसी आरक्षण हीच आपली मागणी आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतील काही भागात मराठे कुणबी असल्याचे पुरावे सापडत नव्हते म्हणून ते म्हणत होते की, मराठे कुणबी एक नाही. आता पुरावे सापडले आहेत."
"ज्यांना कुणबी नकोय, ते आमच्यावर रुसायला लाकगले आहेत. ज्यांना कुणबी म्हणून नकोय मराठा म्हणून हवं होतं, त्यांना काल आरक्षण मिळालं. सरकार म्हणत होतं की, जे विरोध करताहेत त्यांच्यामुळे कुणबी मराठा आम्हाला एकत्र करता येत नाही. पण, आता त्यांना दिलं गेलं आहे, आता सरसकट कुणबी-मराठा करायला काय हरकत आहे. आता विरोध करणार कोण राहिलं. ज्याचा विरोध आहे, त्याला १० टक्क्यातून घे", असे मनोज जरांगे म्हणाले.
"आता विरोध करणारे नाही राहिले. जे विरोध करणारे आहेत, त्यांना म्हणावं १० टक्क्यातून घे", असे जरांगे पाटील म्हणाले.
- 01:11 PM • 21 Feb 2024कृषी मंत्र्यांच्या बैठकीनंतर आता शेतकरी नेते शेतकऱ्यांबरोर चर्चा करणार
कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी आता शेतकऱ्यांबरोबर चर्चा सुरु केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत चर्चा होणार नाही, बैठक संपणार नाही तोपर्यंत आम्ही पुढं सरकणार नाही. शेतकरी चर्चा करण्यास तयार आहेत, तर दुसरीकडे शंभू बॉर्डवर मात्र पोलीस आणि सुरक्षा दलाकडून कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
- 12:41 PM • 21 Feb 2024सरकारकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी पुन्हा दिले निमंत्रण
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पाचव्या दिवसानंतर सरकारने चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. यावेळी कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, शेतकऱ्यांनी शांतता राखावी. शेतकऱ्यांनी सरकारसमोर 13 कलमी मागण्या मांडल्या होत्या, त्यापैकी 10 मागण्या मान्य केल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले, मात्र त्यातील तीन मागण्यांबाबत संदिग्धता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर सरकारनेही मान्य करण्यात आल्या आहेत. तीन मागण्यांच्या पूर्ततेबाबत संदिग्धता आहे. त्यानंतर सरकारने एमएसपीबाबतही एक फॉर्म्यूला शेतकऱ्यांसमोर ठेवला होता, मात्र त्या तीन संदिग्ध मागण्यांवर शेतकरी ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
- 12:12 PM • 21 Feb 2024शंभू सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ड्रोनमधून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या
शेतकऱ्यांनी आता शंभू सीमेवरून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांनीही जोरदार तयारी केली आहे. ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे चेंगराचेगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सकाळी अकरा वाजताच शेतकऱ्यांनी आम्ही दिल्लीकडे कूच करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शेतकरी पुढं पुढं सरकताच ड्रोनमधून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
- 12:05 PM • 21 Feb 2024शंभू सीमेवर शेतकऱ्यांची 1200 ट्रॅक्टर, बळीराजाने सरकारला ठणकावले
शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलनाची आता ताकदीनिशी पूर्ण तयारी केली आहे. पोकलेन जेसीबीसह सुमारे 1200 ट्रॅक्टर तैनात करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT