Pune News : पत्रकार पंकज खेळकर यांचे सोमवारी (12 मार्च) रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. 'इंडिया टुडे', 'आज तक' आणि 'मुंबई तक'चे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली.
ADVERTISEMENT
पुण्यातील पाषाण येथील राहत्या घरी सोमवारी रात्री पंकज खेळकर यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (13 मार्च) रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पत्रकार पंकज खेळकर हे मूळचे अकोल्याचे होते. ते पुण्यात आले आणि तिथेच स्थायिक झाले. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारितेला सुरूवात केली होती.
ते गेल्या 23 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत होते. प्रशिक्षणार्थी पत्रकार ते असोसिएट एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. गेल्या अनेक वर्षांपासून ते 'इंडिया टुडे', 'आज तक'चे पुणे ब्युरो म्हणून काम पाहत होते.
गाजलेल्या प्रकरणांमध्ये वार्तांकन
1992 मध्ये पंकज खेळकर यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात त्यांनी रिपोर्टिंग केली. त्यांनी अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये वार्तांकन केले. कोट्यवधी रुपयांचा तेलगी स्टॅम्प घोटाळा, मुंबईत 2008 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट या घटनांचे वार्तांकन त्यांनी केले.
ADVERTISEMENT