Lathi charge on Warkari : “फडणवीस म्हणतात ते वेगळे व प्रत्यक्ष चित्र वेगळे. फडणवीस यांनी चुकीच्या लोकांचे समर्थन करण्याचे सोडले पाहिजे”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा केला. या घटनेवरून शिवसेनेने तुषार भोसलेंवरही टीकेचे बाण डागले आहेत.
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “वारकऱ्यांवर आळंदीत निर्घृण असा लाठीमार झाला आहे. आळंदीतून ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होणार होते. हजारो वारकरी त्यासाठी गळय़ात तुळशीमाळा घालून, कपाळास अबीरबुक्का लावून, खांद्यावर पताकांचे भार घेऊन जमले. तोंडाने ‘ग्यानबा तुकाराम’, ‘रामकृष्ण हरी’ हा नाममंत्र जपत ते दंग झाले असतानाच त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.”
भोंदू आचार्य तुषार भोसले आणि…
भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंवर ठाकरे गटाने ठपका ठेवला आहे. “तीर्थक्षेत्र आळंदी येथे नेमके काय घडले ते वारकऱ्यांकडून त्यांच्याच शब्दांत समजून घेतले पाहिजे. वारकरी सांगतात, ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होता. हा संपूर्ण सोहळा राजकीय स्वार्थासाठी हायजॅक करण्यात आला. भाजपचा आध्यात्मिक आघाडीचा भोंदू आचार्य तुषार भोसले व मिंधे गटाचा अक्षय शिंदे या लोकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्यात हस्तक्षेप सुरू केला. मानाच्या दिंड्या व फडकरी यांना अपमानास्पद वागणूक दिली. मर्जीतल्याच लोकांना प्रवेश दिला. यावरून वादावादीस सुरुवात झाली. वारकऱ्यांच्या भावना समजून न घेता डुप्लिकेट वारकरी तुषार भोसले याने चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अरेरावी सुरू केली. त्यातून रेटारेटी झाली व वारकऱ्यांना पोलिसांनी बदडले.’ या सर्व प्रकरणास डुप्लिकेट वारकरी तुषार भोसले हाच जबाबदार आहे.”
फडणवीसांना सवाल… खोटेपणास काय म्हणावे?
“महाराष्ट्राच्या इतिहासात वारकरी संप्रदायावर पालखी सोहळय़ात असा लाठीमार झाला नव्हता. हिंदुत्वाच्या नावाने छाती पिटणाऱ्या व गळे फोडणाऱ्या मिंधे-फडणवीसांच्या राजवटीत हे घडले आहे. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. सरकारचे म्हणणे आहे, लाठीमार झालाच नाही. सरकारच्या बुबुळांच्या गारगोट्या झाल्या आहेत. त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. वारकऱ्यांवरील मारहाणीचे, लाठीमाराचे ‘व्हिडीओ’ समोर आले तरीही गृहमंत्री फडणवीस म्हणतात, असे काही झालेच नाही. काय म्हणावे या खोटेपणास?”, असा शाब्दिक हल्ला ठाकरे गटाने फडणवीसांवर चढवला.
हेही वाचा >> Eknath Shinde : ‘शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना काढा’, हायकमांडचा CM शिंदेंना आदेश, ‘ते’ मंत्री कोण?
“भाजपच्या तथाकथित आध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसले हा वारकऱ्यांवर दबाव आणून भाजपास हवे ते करून घेण्याच्या प्रयत्नात होता व त्याच्यामुळेच आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसी हल्ला झाला. त्यामुळे या तुषार भोसलेवर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मंदिरात ठरावीकच संख्येने प्रवेश देण्यावरून वारकरी व प्रशासनात वाद झाला असेल तर वारकरी संप्रदायास विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात सरकार कमी पडले. येथे राजकीय घुसखोरीचा प्रयत्न झाला व आळंदीतील शांततेला तडा गेला”, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
हेही वाचा >> “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, देवेंद्र फडणवीसांना इशारा?
“फडणवीस म्हणतात ते वेगळे व प्रत्यक्ष चित्र वेगळे. फडणवीस यांनी चुकीच्या लोकांचे समर्थन करण्याचे सोडले पाहिजे. वारकऱ्यांवरील लाठीहल्ला पाहून पांडुरंगाच्या काळजाचेही पाणी पाणी झाले असेल. बा… पांडुरंगा, कमरेवर हात ठेवून तुझ्या भक्तांवर आलेले हे संकट फक्त पाहू नकोस, अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकव… हेच तुझ्या चरणी साकडे”, असे साकडे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विठ्ठल चरणी घातले आहे.
ADVERTISEMENT