ADVERTISEMENT
मशिदींवरील भोंग्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मनसेकडून मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजण्याचा इशार दिल्यानंतर अनेक ठिकाणी पहाटेची नमाज भोंग्यांशिवाय अदा केली जात आहे.
वाशिम जिल्ह्यातही मुस्लीम समुदायाकडून भोंग्यांचा वापर न करता पहाटेची नमाज अदा केली जात आहे.
मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कारंजा शहरातही भोंग्याविना पहाटे नमाज पठण केलं जात आहे. ज्या लोकांपर्यंत अजानची आवाज पोहोचत नाही, अशांच्या घरी जाऊन निरोप दिला जात आहे.
त्याचबरोबर अजान देणाऱ्या व्यक्तीकडून मोबाईलवरून नमाज अदा करण्यासाठी येण्याची माहिती दिली जात आहे.
अजान पठण करणाऱ्या वसीम शेख यांनी सांगितलं की, जेव्हापासून भोंगे बंद करण्यात आले आहेत, तेव्हापासून नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांच्या वापराबद्दल दिलेल्या आदेशाचं पालन सर्वच मशिदींमध्ये होत असून, शहरात शांततापूर्ण वातावरण असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून भोंग्यांचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. तसेच भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलेला आहे.
४ मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अजानसाठी भोंग्यांचा वापर करणाऱ्या मशिदींबाहेर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला होता.
ADVERTISEMENT