माहिम दर्गा अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी मनसेच्या अमेय खोपकरांचं ट्वीट
गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची 22 मार्च रोजी शिवाजी पार्कवर सभा झाली. यावेळी त्यांनी माहिम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याबाबत उल्लेख केला. त्यानंतर, हा मुद्दा चांगलाच चर्चेत रंगल. 23 मार्च रोजी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सात जणांच्या पथकाने यांची पाहणी करत कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगलाच टोला लगावला आहे. एक फोटो शेअर करत ‘हिंदुत्वाचं ढोंग नाही “Results” देणारं खर हिंदुत्व !!’ असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
शेअर केलेल्या फोटोमध्ये असं लिहिलं आहे की, ‘काही जण एका महिलेच्या घरावरती हाथोडा चालवून मर्दपणा दाखवत होते!आता हे खरं उखाड दिया’ अशी खोचक टीका अमेय खोपकरांनी केली आहे.
सावकरांवरून पुन्हा ठिणगी! राहुल गांधींविरोधात विधानसभेत गदारोळ
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांचा मुद्दा आज शिवसेनच्या (शिंदे गट) आमदारांनी उपस्थित केला. सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान असून, राहुल गांधी त्यांचा वारंवार अपमान करत असल्याचं आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
संजय शिरसाट या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. माझा जुन्या सहकाऱ्यांना सवाल आहे की, राहुल गांधींच्या विधानाला तुमचा पाठिंबा आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
आशिष शेलार म्हणाले की, हे (काँग्रेस) माफी मागणार आहेत का? राहुल गांधींना परदेशात भारताचा अपमान केला. त्यांनी सावरकरांचाही अपमान केला. हे जोडे मारायच्या लायकीचे आहेत, अशी टीका शेलारांनी केली.
सूरत न्यायालयाने ठोठावली शिक्षा; राहुल गांधी म्हणतात,…
सूरत सत्र न्यायालयाने बदनामीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचा एक विचार ट्विट केला आहे. “माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हाच माझा ईश्वर आहे, अहिंसा त्याला साध्य करण्याचं साधन आहे”, असं महात्मा गांधींचं हे विचार आहे.
सलमान खानला पाठवलेल्या धमकीच्या ईमेलची यूके लिंक!
अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या ई-मेल प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना या धमकीची (यूके) ब्रिटन लिंक सापडली आहे. ज्या ईमेलवरून हा मेल पाठवला गेला होता, त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी, हा मेल ब्रिटनमधील एका मोबाइल नंबरशी जोडलेला असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. आता पोलीस ज्या व्यक्तीच्या नावावर हा नंबर नोंदवला आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
बारामतीत साखर कारखान्याला भीषण आग, तब्बल 1.35 कोटींच्या मालाची झाली राख
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीच्या साडेचार हजार टन बगॅसला आग लागली. मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कारखान्याचे तब्बल सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुढील हंगामासाठी कारखान्याने प्राथमिक शाळा सोमेश्वरनगर या ठिकाणी साडेतीन हजार टन बगॅस ठेवला होता. सायंकाळच्या सुमारास या बगॅसला अचानक आग लागली. कारखान्याच्या अग्निशामक बंबाचे आग विझवण्यासाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले. यामुळे नीरा पोलिकेम येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ही आग आटोक्यात आली नाही. त्यात सुटलेल्या वाऱ्यामुळे बगॅसने लवकर पेट घेतला. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड सर्व अधिकारी वर्ग तसेच कामगारांनी घटनास्थळी हजर होते.
खळबळजनक! भाजप नेते हसंराज अहिराच्या पुतण्याचा आढळला मृतदेह
भाजप नेते हंसराज अहीर यांचा पुतण्या महेश अहीर आणि त्याच्या मित्राचा पंजाबमध्ये मृतदेह आढळला आहे. 15 दिवसांपासून दोघंही बेपत्ता होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. पण, पंधरा दिवसांनंतर पंजाबमध्ये दोघांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. यामुळे ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
हंसराज अहीर यांचा पुतण्या महेश, मित्र हरीश धोटे हे दोघं 15 मार्चपासून बेपत्ता होते. चंदीगड पोलिसांना सेक्टर 43 मधील कजेडी गावाजवळ जंगलात हे दोन मृतदेह आढळले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत.
औरंगाबादमध्ये बोर्डची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल!
औरंगाबाद नावाच्या बोर्डाची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतरही आय लव्ह औरंगाबाद असा बोर्ड ठेवण्यात आला होता. यावेळी भाजपच्या पदाधिकारी अनुराधा चव्हाण यांनी आय लव्ह औरंगाबाद या बोर्डाची तोडफोड केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
प्रशासनाची कारवाई, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी माहिम किनाऱ्यालगतच्या समुद्रात सुरु असलेल्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जिल्हा प्रशासनाने सकाळीच कारवाई केली. या कारवाईनंतर आता राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. सकाळी 10.15 वाजता राज ठाकरे यांच्या घरीच ही बैठक होणार आहे.
अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर खोके आणि कापूस फेकला, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन
जळगाव जिल्हातील धरणगावात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खोके व कापूस फेकत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. धरणगावात पाहणी दौरा आटोपल्यानंतर ते जळगावकडे जात असताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर खोके व कापूस फेकून मारला. धरणगावात यावेळी जोरदार आंदोलन करण्यात आले.
ADVERTISEMENT