Saroj Ahire MLA : शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवारांनी बंड केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न सुरू असून, नाशिकमध्ये पोहोचताच अजित पवारांनी शरद पवारांना आणखी एक धक्का दिला आहे. देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. (MLA Saroj Ahire announced support to ajit pawar)
ADVERTISEMENT
गेल्या 12 दिवसांपासून खातेवाटप रखडले होते. त्यामुळे अजित पवार हे मुंबईतच होते. खातेवाटप झाल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्रात फिरण्यास सुरुवात केली असून, शनिवारी (15 जुलै) ते नाशिक दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या स्वागतासाठी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे रेल्वे स्थानकावर हजर होत्या.
सरोज अहिरेंनी अजित पवारांना पाठिंबा का दिला?
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आमदार सरोज अहिरे आल्यानंतर माध्यमांनी त्यांना भूमिकेबद्दल प्रश्न केला. आमदार अहिरे म्हणाल्या, “माझा निर्णय झालेला आहे. जनतेचा कौल अजित पवारांच्या बाजूने आहे. मी जनतेची सेवक म्हणून अजित पवारांना जाहीर पाठिंबा देत आहे.”
वाचा >> “सुप्रिया सुळेंचं नाव येताच प्रफुल पटेल म्हणाले मी राजीनामा देतो”
“याचा उद्देश एकच आहे की, पुढच्या एक-दीड वर्षामध्ये जो माझा कार्यकाळ शिल्लक आहे, त्यामध्ये भरघोस निधी आणून मतदारसंघाचा विकास कसा करता येईल, हाच माझा दृष्टिकोन आहे. जनतेच्या वतीनेच मी अजित पवारांना पाठिंबा जाहीर करत आहे”, असं सरोज अहिरे यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंसोबत काय झाली चर्चा?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरोज अहिरे यांची भेट घेतली होती. त्याबद्दल प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या, “सुप्रिया सुळेंची भेट कुटुंबाची सदस्य म्हणून होती. त्यांनीही सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक सदस्य म्हणून त्यांनी नाशिक दौऱ्यावर असताना भेट घेतली. माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या आल्या होत्या. कोणतीही राजकीय चर्चा आमच्यात झाली नाही.”
वाचा >> खातेवाटप कोणाला ठरला लाभदायक?, कोणत्या मंत्र्याने कमावलं, कोणी गमावलं?
“प्रमुख लोकांशी चर्चा करणार, असं मी म्हणाले होते. माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. जवळपास 95-98 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, विकासासाठी अजित पवारांसोबत जायला हवं. अजित पवारांनी माझा उल्लेख विकास कन्या म्हणून केला होता. तेच टिकवून ठेवण्यासाठी मी त्यांना पाठिंबा जाहीर करत आहे”, असं सरोज अहिरे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT