Nitin Gadkari On Shiv Sena MLA : अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. अजित पवार गट भाजप-शिवसेना युतीत सामील झाल्याने त्यांना 9 मंत्रिपदे देण्यात आली. त्यामुळे शिंदेंच्या सेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेकांचा पत्ता कट होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांनीही हे बोलून दाखवलं असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याच मुद्द्यावरून खपली काढली आहे.
ADVERTISEMENT
एक भाकरी मिळणार होती, आता अर्धीच भाकरी मिळणार असं म्हणत शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. आमदार संजय शिरसाट यांनीही न्याय द्यावा लागेल, असं म्हटलं होतं. गोगावले आणि शिरसाट यांच्याप्रमाणेच शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. पण, अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्याने अनेकांना आपली संधी जाणार अशी भीती वाटू लागली आहे. याच राजकीय स्थितीवर नितीन गडकरींनी मिश्कील भाषेत टिप्पणी केली आहे.
नितीन गडकरी काय म्हणाले?
“युनोमध्ये भूतानचे पंतप्रधानांनी असा विषय मांडला की, डोमेस्टिक हॅप्पी इंडेक्स. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण सारे दुःखाचा महासागर आहोत. कुणीच खूश नाही. जे आता परिषदेवर निवडून आले, त्यांना वाटेल की, आपलं आता पुढे काय? जे नाही झाले, ते म्हणतील आपल्याला पुढे संधी मिळणार की नाही? प्रत्येकासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की, आपल्या सगळ्यांच्या जीवनात कुणीच समाधानी नाही”, असं मत नितीन गडकरी यांनी मांडलं.
वाचा >> अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचं वाढलं टेन्शन, ‘हे’ असेल मोठं आव्हान
शिवलेले सूट, मंत्रीपदाची संधी हुकणार?
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “समाधान मानण्यावर आहे. आपण स्वीकारलं की, आपल्या औकातीपेक्षा आणि पात्रतेपेक्षा मला जास्त मिळालं, तर माणूस आनंदी राहतो. नाहीतर जे नगरसेवक आहेत, ते या करिता दुःखी आहेत की, ते आमदार झाले नाहीत. आमदार या करिता दुःखी आहेत की, ते मंत्री झाले नाहीत. मंत्री जे दुःखी आहेत, ते या करिता दुःखी आहेत की त्यांना चांगलं खात मिळालं नाही.”
वाचा >> NCP चे अध्यक्ष शरद पवार की, अजित पवार? पक्षाची घटना, नियम काय सांगतात?
“आता जे होणार होते, ते या करिता दुःखी आहेत की, आपल्याला आता संधी मिळते की नाही, इतकी गर्दी झाली आहे. आधी सूट शिवून तयार होते. केव्हा येते अन् केव्हा जातो. आता त्या सुटाचं काय करायचं असा प्रश्न आहे. गर्दी झाली आहे. मी रामदासींना म्हणालो की, या हॉलची क्षमता 2200 आहेत. किती आले तरी बसू शकतात. पण, मंत्रिमंडळाची अशी क्षमता वाढवता येत नाही. त्यामुळे आपला देश आणि समाज हा दुःखी आत्म्यांचा महासागर आहे”, असं म्हणत नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदेंच्या आमदारांची खपली काढली.
ADVERTISEMENT