Mumbai Corona Update: मुंबई: देशभरात कोरोनाने (Corona) डोकं वर काढलेलं असताना आता मुंबईत (Mumbai) देखील कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत आज (10 एप्रिल) एका कोरोना रुग्णाचा मृत्यू (Corona Patient Death) झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाने मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. कारण पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज मुंबईत दिवसभरात 95 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर आज घडीला मुंबईत 1454 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (number of corona patients increased in mumbai death of one covid positive patient)
ADVERTISEMENT
मुंबईतील कोरोना रुग्णाची नेमकी स्थिती काय?
यापैकी लक्षणं नसलेले 67 रुग्ण आहेत. तर आज दिवसभरात 28 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एकूण 102 रुग्ण हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. ज्यापैकी एकूण 35 जण हे कृत्रिम ऑक्सिजनवर आहेत. सध्याच्या घडीला मुंबईत 4356 बेड उपलब्ध असून त्यापैकी 102 बेडवर रुग्ण आहेत.
अधिक वाचा- Corona: मुंबईकरांना Covid अलर्ट, मास्क सक्तीबाबत झाला मोठा निर्णय!
धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत कोरोनाने एका 51 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात 1082 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 95 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अधिक वाचा- मुंबईत कोरोनाची गती वाढली; 6 राज्यात सक्रिय रुग्णांमुळे वाढलं टेन्शन
आजपर्यंत मुंबईत कोरोनाचे एकूण 11 लाख 58 हजार 983 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 11 लाख 37 हजार 779 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईत दिवसभरात कोरोनामुळे 1 रूग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 19 हजार 750 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आज मुंबई महापालिकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. तसेच मुंबई महापालिकेत रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचारी यांना मास्क सक्ती असणार आहे.
मुंबई महापालिका सज्ज
‘केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे’, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अधिक वाचा- Covid 19 : नव्या व्हेरिएंटचा ‘या’ लोकांना जास्त धोका, यात तुम्ही तर नाही ना?
कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील ६० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठरेल. त्यांना मास्कची सक्ती नसली तरी खबरदारी घेणे हे अधिक योग्य आहे. शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.
ADVERTISEMENT