-अनिकेत जाधव, लातूर
ADVERTISEMENT
Parliament security breach: संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याचा आरोप असलेल्या अमोल शिंदेच्या वडिलांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आपल्या मुलाशी फोनवर बोलाणं करून द्यावं, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, “मी मजूर म्हणून काम करतो. माझ्याकडे घरी चहापत्तीसाठीही पैसे नाहीत. माझं माझ्या मुलाशी बोलणं करून द्या नाहीतर मी आत्महत्या करेन.”
संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याचा आरोप असलेला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, या घटनेनंतर धनराज शिंदेंना मुलगा अमोलशी बोलायचे आहे. अमोलशी एकदा तरी फोनवर बोलणं करून द्या, असे अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >> शिंदे सरकारला जरांगेंचा स्पष्ट ‘मेसेज’; म्हणाले “देव सुद्धा मराठ्यांना…”
लातूर जिल्ह्यातील एका गावात राहणारे अमोलचे आई-वडील मजुरी काम करून घर चालवतात. मुलाच्या अटकेनंतर रडून रडून हाल सुरू आहेत. यामुळे येत्या तीन दिवसांत अमोलशी बोलणे करून द्या, अन्यथा शहरातील मुख्य रस्त्यावर आत्मदहन करेन, असा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी सरकारला दिला. “आमच्याकडे चहापत्ती विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत, त्यामुळे आम्ही अमोलला भेटायला दिल्लीला जाऊ शकलो नाही. आम्ही मजूर म्हणून काम करतो”, असे ते म्हणाले.
“चार दिवसांपासून मी कामासाठी घराबाहेर पडलेलो नाही”
अमोलच्या वडिलांनी सांगितले की, “संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून तपास पथक घरी पोहोचून चौकशी करत आहे. यामुळे मला कामावर जाता येत नाही. चार दिवस झाले कामासाठी घराबाहेर पडलो नाही. आता आमच्याकडे चहापत्ती विकत घ्यायलाही पैसे नाहीत. सरकारने आमची स्थिती समजून अमोलशी एकदा फोनवर बोलणं करून द्यावं”, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >> “ऑफिसला बोलावलं अन् बलात्कार केला”, उद्योगपती सज्जन जिंदालांवर गुन्हा दाखल
सरकारने माझं आणि अमोलचं बोलणं करून द्याव. तसं घडलं नाही तर तीन दिवस वाट बघेन आणि त्यानंतर चाकूर शहराच्या मुख्य रस्त्यावर आत्मदहन करणार असा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी दिला. “अमोलने कोणता मोठा गुन्हा केला आहे, हेही सरकारने सांगावे”, असे धनराज शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT