एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडे हे भ्रष्टाचार प्रकरणात चांगलच अडकण्याची चिन्ह दिसत आहे. सीबीआयने तब्बल 25 कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात समीर वानखेडेंसह इतर काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. CBI ने दाखल केलेल्या FIR मुंबई Tak ला मिळाली असून, यात गंभीर गोष्टींची नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अशा काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेले आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
समीर वानखेडे आणि टीमने काही जणांना सोडून दिलं…
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. यात एक आरोप असा केला होता की, क्रूझवरील पार्टीत एक ड्रग्ज तस्करही होता. पार्टीत ठराविक लोकांवरच कारवाई करण्यात आली आणि इतरांना सोडून देण्यात आले. हा ड्रग्ज तस्कर समीर वानखेडेंचा मित्र असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
हेही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
दरम्यान, सीबीआयच्या एफआयआरमध्येही याबद्दल नोंद करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, मुंबई पोर्ट ट्र्स्टच्या गेटवरून बाहेर सोडताना आशिष रंजन यांच्याकडून अनेक प्रवाशांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी संशयित अरबाज ए. मर्चंट याने चरस लपवले असल्याची कबुली दिली. त्याने बुटात आणि झिपमध्ये लपवलेले पाऊच आशिष रंजन यांच्याकडे दिले.
एनसीबी अधिकाऱ्यांनी उल्लेख केलेल्या अनेक व्यक्तींची तपासणी करण्यात आली, पण त्यांच्या नावांची नोंद करण्यात आली नाही. यातील काही संशयित व्यक्तींना त्यांची कोणतीही माहिती नोंदवून न घेता सोडून देण्यात आलं. सिद्धार्थ शाह ज्याच्यावर अरबाज मर्चंटला सरस पुरवल्याचा आरोप झाला. त्यालाही मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिलं.
हेही वाचा >> संजय राऊत ‘तसं’ बोलून फसले! राणेंसारखी पुन्हा ‘जेल’वारी घडणार?
अरबाज मर्चंटकडून चरस खरेदी करणयासाठी पैसे मिळाल्याची कबूली शाह याने दिली होती. त्यांच्यातील संवादातून हेही समोर आलं होतं की त्यानेही चरसचं सेवन केलेलं होतं.
केपी गोसावीला मूभा देण्यात आली
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना केपी गोसावी या स्वतंत्र साक्षीदाराच्या खासगी वाहनातून एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. आरोपींना हाताळण्यासाठी एनसीबीचे कर्मचारी असतानाही केपी गोसावीचा मुद्दामहून वावरत होता की, तो एनसीबीचा कर्मचारी वाटावा.
नियम नसताना आरोपींसोबत केपी गोसावीला हजर राहण्याची परवानगी दिली. स्वतंत्र साक्षीदारांच्या नियमांचा भंग करून धाड टाकल्यानंतर त्याला एनसीबी कार्यालयात येण्याचीही परवानगी दिली गेली. अशा प्रकारे त्याला मोकळीक दिली गेल्याने केपी गोसावीने आरोपीसोबत सेल्फी घेतल्या, आवाजही रेकॉर्ड केला, असं या एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
पहिल्या नोंदीमध्ये असलेल्या संशयित आरोपींची नाव नंतर वगळण्यात आली. सुरूवातीच्या नोटमध्ये 27 संशयितांची नावे होती. मात्र सुधारित नोदींमध्ये केवळ 10 संशयित आरोपींच्याच नावे ठेवण्यात आली, असंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT