Badlapur Exclusive : ''आंदोलनात दिसल्यास FIR दाखल करणार'', पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांची धमकी

सौरभ वक्तानिया

22 Aug 2024 (अपडेटेड: 22 Aug 2024, 05:16 PM)

Badlapur News Case Update : आम्ही शाळेत गेलो होतो. आमच्याकडे वैद्यकीय अहवाल देखील होता. मात्र अशा प्रकारची घटना आमच्या शाळेत घडू शकत नाही, असे शाळा प्रशासनाने पीडितेच्या कुटुंबियांना सांगितले. शाळा प्रशासनाच्या या भुमिकेनंतर आम्ही थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.

 badlapur school case victim girl family big shocking revealation on assult case read full story

बदलापूर प्रकरणात पीडित कुटूंबियांचा खळबळजनक खुलासा

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी तक्रार दाखलच करून घेतली नाही

point

मनसेच्या मदतीने तक्रार दाखल करता आली

point

तक्रार दाखल करून घेण्यास पोलासांची दिरंगाई

Badlapur News Case Update Exclusive : बदलापूरमधील चिमुरडींच्या अत्याचार (Badlapur Assault Case) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता सगळ्यात मोठा खुलासा समोर आला आहे. बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात ज्यावेळी नागरीकांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आंदोलन केले होते. त्यावेळेस पोलिसांनी पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले होते. तसेच आंदोलनात सहभागी झाल्यास एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. (badlapur school case victim girl family big shocking revealation on assult case read full story) 

हे वाचलं का?

आजतक, इंडिया टुडेने बदलापूर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांशी बातचीत केली आहे. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 13 ऑगस्ट रोजी आम्ही खाजगी रूग्णालयात चाचणीसाठी गेलो होतो. या चाचणीत डॉक्टरांनी तुमच्या मुलीसोबत अशी (अत्याचार) घटना घडल्याचे सांगितले. तसेच तिचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

दरम्यान पीडितेच्या मैत्रिणीसोबत देखील अशीच घटना घडलेली. त्यामुळे तिच्या रिपोर्टसाठी आम्ही एक दिवस वाट पाहिली. त्यानंतर मैत्रिणीचे रिपोर्टही समोर आल्यानंतर आम्हाला धक्काच बसला. कारण दोन्ही मुलींसोबतच एक सारखीच घटना घडली होती.   

हे ही वाचा : MPSC Exam: विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकलं, MPSC परीक्षेबाबत मोठा निर्णय

मुख्याध्यापक आणि शिक्षकावर कारवाईची मागणी 

या संपूर्ण घटनेचा जाब विचारण्यासाठी आम्ही शाळेत गेलो होतो. आमच्याकडे वैद्यकीय अहवाल देखील होता. शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांशी या घटनेची माहिती दिली असता. आमच्या शाळेत घडू शकत नाही, असे म्हणत शाळा प्रशासनाने घटनेस नकार दिला. ही घटना शाळेत नसून शाळेबाहेर घडल्याचे म्हटले किंवा सायकल चालवताना घडले असावे,असा दावा केला होता. पण आमच्याकडे वैद्यकीय अहवाल आहे आणि  सायकल चालवताना असे घडू शकत नाही,असे आम्ही त्यांना म्हटलं. त्यामुळे शाळेला तातडीने माहिती देऊन देखील त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांवरही कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी केली. 

शाळा प्रशासनाच्या या भुमिकेनंतर आम्ही थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. तसेच आमच्याकडे वैद्यकीय अहवाल असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी आमचा वैद्यकीय अहवालही पाहिला नाही याउलट आम्हाला ताटकळत बसून ठेवले. तसेच आमचे अजिबात एकून घेतले नाही, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केला. 

पोलिस आमचे ऐकत नसल्याने आम्ही मनसेच्या स्थानिक नेत्यांना बोलावून त्यांची मदत मागितली. मनसेचे नेते पोलीस ठाण्यात आले, मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. नंतर मनसेच्या लोकांनी वरिष्ठ पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर एक वरिष्ठ पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर तब्बल 12 तासांनंतर आमची एफआयआर दाखल करून घेण्यात आली. मात्र त्या एफआयआरमध्ये आम्ही जे सांगितले होते, त्यात पोलिसांनी अनेक बदल केले होते, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केला.

हे ही वाचा : Sharad Pawar: '...तर मी स्वत: आंदोलनाला उतरणार', शरद पवारांचा सरकारला थेट इशारा! नेमकं घडलं काय?

एफआयआर दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आम्हाला वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले. सकाळी 9 वाजताची वेळ दिलेली पण पोलीसच 11.45 वाजता रूग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे  हॉस्पिटलमध्येही दोन्ही लहान मुलींना कित्येक तास हॉस्पिटलमध्ये बसून रहावे लागले. निष्पाप मुलींना त्यांच्यासोबत काय चालल आहे, याचे भान नव्हते. त्यानंतर पुन्हा दुपारी 4 वाजता त्यांनी आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावले आणि तेथेही बसवून ठेवले. लहान मुलगी आणि तिच्या गरोदर आईसोबत आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बसाव लागलं. तसेच सरकारी हॉस्पिटलमधून काही महत्वाची कागदपत्रे गायब झाली होती. ती कागदपत्रे आम्हाला शोधायला लावली. नंतर तीच कागदपत्रे डॉक्टरांच्या डेस्कवर आढळली. त्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशन ते हॉस्पिटल पळायला लावले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्हीची मागणी देखील केली होती. मात्र शाळा प्रशासनाने सीसीटीव्हीचे कामकाज सूरू असल्याने ते 15 दिवसांपासून बंद असल्याचे कारण दिल्याचे पीडितेचे कुटूंबीय म्हणाले. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे पुरूष स्टाफ का ठेवला? याचा जाब देखील विचारला होता. 

महिला पोलीस अधिकाऱ्याकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न 

दरम्यान आम्ही शाळेत असताना महिला पोलीस अधिकारी देखील दाखल झाल्या होत्या. त्यावेळी आम्हाला बाहेर बसायला लावले आणि महिला पोलीस अधिकारी एकट्याच खोलीत गेल्या आणि त्यांनी शाळाप्रशासनाची चर्चा केली. खोलीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की, ''अशी कोणतीही घटना घडलेली नाही, त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवू नका.'' यावेळी आम्ही त्यांना आमच्याकडे वैद्यकीय पुरावे असल्याचे देखील सांगितलं मात्र त्यांनी काही एक ऐकलं नाही. या शाळेचा राजकारणी नेत्यांशी काहीतरी संबंध आहे, त्यामुळे महिला अधिकाऱ्याने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला.

दरम्यान डॉक्टरांनी पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितले होते. परंतु पोलिसांनी 12 तासांनंतरच एफआयआर दाखल केला. तसेच घटनेनंतर आरोपी कुठेच सापडला नाही, मात्र अचानक 17 ऑगस्टला तो कसा सापडला हे आम्हाला माहीत नाही, असे देखील पीडित कुटुंबीयांनी म्हटले आहे. 

कुटुंबाच्या मागण्या काय? 

अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांना मरेपर्यंत फाशी द्यावी. अशा अनेक घटना घडत आहेत, जर आपण उदाहरण ठेवले नाही तर अशा घटना घडतच राहतील. त्यामुळे सरकारने अशा व्यक्तीला फाशी द्यावी. जो माणूस असा गुन्हा करेल त्याला माहित आहे की त्याला काहीही होणार नाही, एकतर तो जन्मभर तुरुंगात राहील किंवा 12 वर्षांनी सुटका होईल, त्यामुळे त्यांना कोणतीही भीती नाही, असे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले. 

चिमुरडीची तब्येत कशी आहे? 

घरातील सर्वांची प्रकृती ठीक नाही. आई गरोदर आहे, वडिलांची प्रकृती ठीक नाही. गरोदर मातेची अनेक ठिकाणी धावपळ झाली, त्यामुळे तिची तब्येत खालावली आहे. ती अत्यंत अस्वस्थ आहे. या घटनेत लहान चिमुरडीचा छळ झाल्याने ती कुणाकडेही जायला तयार नाही आहे. वडील सध्या अंथरुणावर आहेत. वेगवेगळ्या विभागांचे पोलिस येत राहतात आणि तेच प्रश्न विचारतात. 

पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावले 

बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आम्हाला धमकी दिल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जेव्हा बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू होते, तेव्हा आम्हाला तुम्ही या आंदोलनात दिसता कामा नये. जर आंदोलनात दिसल्यास कठोरात कठोर कारवाई केली जाईल. तसेच बदलापूरातील आंदोलन भडकावल्याच्या नावाखाली आमच्यावर गुन्हा दाखल करू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. 

पोलिसांनी 'ती' गोष्ट लेखी लिहून घेतली 

आंदोलनाच्या दिवशी आम्हाला, वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की ते डीसीपी आहेत. डीसीपीने आम्हाला सांगितले की, आंदोलकांना हटवण्यासाठी 200 हून अधिक पोलिसांचा ताफा मागवण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन नको, असे लिहून द्या, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पेपरमध्ये लिहायचे आहे की आम्हाला हे आंदोलन नको आहे आणि आम्ही कोणालाही येथे आंदोलन करण्यासाठी बोलावले नाही. आम्ही पोलिसांना सांगितले की लोक काय करत आहेत ते स्वतः करत आहेत, आम्ही त्यांना बोलावले नाही. आम्ही लेखी देणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले. 

दरम्यानच्या या संपूर्ण काळात आम्हाला शिवीगाळ केली गेली, धमक्या दिल्या, महिला अधिकारी तासनतास बेपत्ता होती. आमच्यासोबत ज्या काही घटना घडल्या आहेत, त्यामुळे आम्ही पोलिसांवरील विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांकडून न्याय मिळेल की नाही असे वाटत नाही, अशी खंत देखील पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
 

    follow whatsapp