Thane : ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाकडून मारहाण; वादाचं कारण आलं समोर

मुंबई तक

04 Apr 2023 (अपडेटेड: 04 Apr 2023, 07:15 AM)

ठाण्यातील कासारवडवली येथे ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात रोशनी शिंदे जखमी झाल्या.

Shiv Sena's Thackeray faction woman worker attacked by shinde faction women worker in thane

Shiv Sena's Thackeray faction woman worker attacked by shinde faction women worker in thane

follow google news

Shiv Sena clashes in thane : ठाण्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कासारवडवली येथे ठाकरे गटातील एका महिलेला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. दरम्यान, खासदार राजन विचारे, केदार दिघे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली.

हे वाचलं का?

शिंदे विरुद्ध ठाकरे गट; प्रकरण काय?

मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव रोशनी शिंदे असं आहे. त्या टिटवाळा येथे राहतात. रोशनी शिंदे या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवती सेनेसाठी काम करतात. सोमवारी सायंकाळी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटनेची चर्चा सुरू झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिलांचा एक गट रोशनी शिंदे यांना घेरून वाद घालताना दिसत आहे. त्यानंतर त्यांना कार्यालयात घेऊन जाताना दिसत आहे.

रोशनी शिंदे यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे?

शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी शिंदे यांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रोशनी शिंदे यांनी म्हटलं आहे की, “टाटा मोटर्स कासारवडवली येथे कामावर असताना ऑफिसमध्ये शिंदे गटाच्या महिलांनी मला शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला केला. रोशनी शिंदे (रा. टिटवाळा) असे आपणास विनंती करते की, मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर रुजू असताना कामावरून सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी आठ वाजून 25 मिनिटांनी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर 15 महिलांनी एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली.”

हेही वाचा – CM Eknath Shinde : शरद पवार, अरविंद सावंत अन् रिक्षावाला; नेमकं प्रकरण काय?

रोशनी शिंदे यांनी पुढे म्हटलं आहे की, “मी आपणास सांगू इच्छिते की, भी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून काम करीत आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले; परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिले, ते ते मी अर्जासोबत जोडलेले आहे.”

कॉलवरुन धमक्या, नंतर ऑफिसमध्ये येऊन हल्ला; तक्रारीत काय?

“मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री साहेबांच्या बायकोचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले. यासंदर्भात माझी चूक नसताना आणि मला भांडण वाढवायचे नव्हते म्हणून मी सॉरीची पोस्ट केली, असे असताना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये वीस महिलांनी एकत्र घुसून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला”, असं रोशनी शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

हेही वाचा – धाराशीवमध्ये मविआ अन् भाजपचा करेक्ट कार्यक्रम; CM शिंदेंनी ठाण्यात बसून दिला धक्का

“त्याबद्दल मी आपणाकडे न्याय मागत आहे, तरी आपणास विनंती आहे; मी आपल्याला या झालेल्या हल्ल्याचे ऑफिसमधील सीसी फुटेज तक्रार अर्जासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासारवडवली यांच्याकडे 3 एप्रिल 2023 रोजी सादर केले आहे. सखोल चौकशी करून तात्काळ हल्लेखोरांवर एफआयआर दाखल करून घ्यावा, ही नम्र विनंती”, असं रोशनी शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही, खासदार राजन विचारेंसह कार्यकर्त्यांचा ठिय्या

या प्रकरणी संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाच्या महिलांकडून कासारवडवली पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यावेळी खासदार राजन विचारे, केदार दिघे हेही पोलीस ठाण्यात आले होते. रोशनी शिंदे या गर्भवती असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

    follow whatsapp