Badlapur Thane School case Update: बदलापूर: बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयातील चार वर्षांच्या चिमुकलीवर करण्यात आलेला लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईसाठी केलेली दिरंगाई यामुळे बदलापूरकरांच्या संतापाचा आज (20 ऑगस्ट) अक्षरश: उद्रेक झाला. यावेळी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून हजारो नागरिकांनी तब्बल 9 तास मध्य रेल्वे रोखून धरली. यावेळी आंदोलक हे शिंदे सरकारवर प्रचंड संतापलेले दिसून आले. (take 2000 rupees from us dont want mazi ladki bahin yojana women of badlapur are furious and very angry with the shinde government)
ADVERTISEMENT
'आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको तर आमच्याकडून 2000 रुपये घ्या आणि आमच्या सुरक्षेसाठी एखादी योजना आणा.' असं म्हणत आंदोलक महिलांनी शिंदे सरकारच्या कारभारावर टीका केली.
'आमच्याकडून 2 हजार रुपये घ्या आणि आमची सुरक्षा करण्यासाठी काहीतरी योजना काढा'
बदलापूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुंबई Tak च्या प्रतिनधीने जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी शिंदे सरकारविरोधात अत्यंत आक्रमक अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या. 'आमची मागणी ही आहे की.. आमच्या हातात आरोपीला सोपवा.. आम्ही बघू त्याचं काय करायचं ते.. मुख्यमंत्री अजून का आले नाही? जर एखादं उद्घाटन असेल तर ते रिबीन कापायला येतात. आता ही बलात्काराची घटना झालीए तर मुख्यमंत्री कुठे आहेत? एकनाथ शिंदे साहेब कुठे आहेत? आता जर उद्घाटन असतं तर... आता कुठे आहेत?'
हे ही वाचा>> Badlapur News: आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण अन् बरंच काही...; पोलिसांनी संतप्त जमावावर केला लाठीचार्ज
'जेव्हा तक्रार नोंदविण्यासाठी गेले तेव्हा तक्रार का घेतली नाही. महिला पोलीस अधिकारी तिथे होते.. तरी तक्रार का घेतली नाही? 12 तास का लावले त्यांना? आणखी एक घटना होण्याची वाट पाहत होते का? महिला या अजिबात सुरक्षित नाहीत.'
'एक काम करा आमच्याकडून 2 हजार रुपये घ्या आणि आमची सुरक्षा करण्यासाठी काहीतरी योजना काढा. लाडकी बहीण योजना नकोय आम्हाला. आमच्यासाठी आम्ही पैसे देतो आणि आमच्या सुरक्षेसाठी योजना काढा. मुली, महिला या सुरक्षित असायला हव्यात.'
'डॉक्टर महिलेवर बलात्कार होतो, जे लोकांचे जीव वाचवतात त्यांच्यावर बलात्कार होतो. चार वर्षाच्या मुलीला काय कळतं.. तिच्यावर बलात्कार होतो. बदलापूर अजिबात सुरक्षित नाही.' असं म्हणत आंदोलक महिलांनी या सगळ्या घटनेबाबत चीड आणि संताप व्यक्त केला.
हे ही वाचा>> Badlapur News: 'मुख्यमंत्री शिंदे कुठे आहेत, त्यांनी इथे यावं...', चिडलेल्या बदलापूरकरांचा प्रचंड संताप
नेमकं प्रकरण काय?
- शाळेतील कर्मचाऱ्याने १२ आणि १३ ऑगस्टला ३ आणि ४ वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
- हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या चिमुकलीनं शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर पालकांना या गंभीर घटनेबाबत कळलं
- १६ ऑगस्टला संतप्त पालक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. परंतु, पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही.
- १२ तासांचा कालावधी उलटल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पोलिसांवर दबाव टाकला. त्यानंतर उशिरा रात्री पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
- १७ ऑगस्टला आरोपीला अटक करुन तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
- शाळेतील सीसीटीव्ही खराब असल्याची माहिती शालेय प्रशासनाने पोलीस आणि पालकांना दिली. त्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आणि या प्रकरणी संशय अधिक बळावला.
- १९ ऑगस्टला बदलापूरच्या नागरिकांनी एक बैठक बोलावली. शालेय प्रशासनावर तातडीनं कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि २० तारखेला बदलापूर बंदची हाक दिली. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. शाळेतील काही कर्मचाऱ्यांनाही निलंबित केलं गेलं आहे.
ADVERTISEMENT