Govinda in Shiv Sena: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जागा वाटप सुरू झालं आहे. पण महायुतीत यावरून बरीच रस्सीखेच सुरू आहे. अशातच शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी एक मोठी खेळी खेळली आहे. ही खेळी म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेते गोविंदा यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. पण याचवेळी त्या मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांची मात्र चिंता वाढली आहे. (lok sabha election 2024 cm eknath shinde big move likely to reject candidature of gajanan kirtikar big leader of shiv sena in mumbai)
ADVERTISEMENT
गजानन किर्तीकरांचं तिकीट कापणार?
अभिनेता गोविंदा हे मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. आज (28 मार्च) गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) उत्तर-पश्चिममधून तिकीट मिळू शकतं. या जागेवरून उद्धव ठाकरे (शिवसेना गट) यांनी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या मतदारसंघात गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. जे सध्या शिंदे गटात आहेत. पण आता गोविंदा यांच्या शिवसेनेतील एंट्रीने किर्तीकरांचं तिकीट कापलं जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, याआधी बुधवारी गोविंदा यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासून गोविंदा हे पुन्हा एकदा राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू होती. आता, गोविंदा यांनी अधिकृतपणे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांना कोणत्या मतदारसंघातून तिकीट मिळणार याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) हे गोविंदा यांना उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात. ज्यामुळे गजानन किर्तीकर यांना मोठा फटका बसू शकतो. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) यांनी आधीच गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना तिकीट देऊन नवा डाव खेळला आहे. अशावेळी शिंदे हे गजानन किर्तीकर यांना तिकीट देणार की गोविंदांना मैदानात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसचे खासदार होते गोविंदा
गोविंदा हे याआधी 2004 ते 2009 पर्यंत काँग्रेसचे खासदार होते. त्यावेळी ते उत्तर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र, 2009 नंतर ते राजकारणापासून दूर झाले होते. अखेर आता पुन्हा एकदा त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
राजा बाबू, कुली नंबर 1 सारख्या चित्रपटांनी दिली ओळख
गोविंदा यांनी आपल्या करिअरमध्ये 165 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये राजा बाबू, कुली नंबर 1, हिरो नंबर 1, बडे मियाँ छोटे मियाँ, भागमभाग, पार्टनर या चित्रपटांनी त्यांना एक वेगळी ओळख दिली. अभिनयासोबतच त्यांच्या डान्सिंग मूव्ह्सही चाहत्यांना आवडतात.
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर 5 टप्प्यात मतदान होणार आहे. येथे पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी तसचे 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान आणि शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) यांची महायुती आहे. या युतीमध्ये राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. ही आघाडी मविआशी स्पर्धा करत आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसचा समावेश आहे.
ADVERTISEMENT