Lok Sabha election 2024 Maharashtra Latest Live News : एकीकडे पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदानाची तारीख जवळ येत आहेत, तर दुसरीकडे इतर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा पारा चढू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीतील लोकसभेच्या जागावाटपाचा घोळ सुटलेला नाही. या संदर्भातील सर्व माहिती आणि घडामोडींचे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी... ( Lok Sabha election 2024 Maharashtra Politics Live News)
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 08:23 PM • 04 Apr 2024प्रकाश आंबेडकरांचा 'शिंदे' पॅटर्न
घोषणा करून पुन्हा उमेदवार बदलल्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना चर्चेत आहे. त्यापाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीनेही हाच पॅटर्नचे अनुकरण केले आहे.
वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवत आहे. वंचितने आतापर्यंत 25 मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार बदलण्यात आले आहेत.
रामटेकमध्ये वंचितने यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. तर यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात वंचितने सुभाष पवार यांना तिकिटं दिले होते. अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आली
आता परभणी लोकसभा मतदारसंघातून बाबासाहेब उगले यांना वंचितने उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्याजागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी गुरुवारी परभणीतून वंचितचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला.
परभणीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून रासपचे महादेव जानकर हे रिंगणात आहेत.
- 08:14 PM • 04 Apr 2024"संजय राठोड, मदन येरावारांमुळे आमची तिकिटं कापली"
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माघार घेण्याची नामुष्की ओढवलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी कुणामुळे उमेदवारी गेली याचा खुलासा केला.
हेमंत पाटील म्हणाले की, "शोले चित्रपट आपण बघितला असेल... शोलेचे जसे पट लेखक आहेत सलीम-जावेद, तसे आमच्या कथेचे लेखक आमदार मदन येरावार आणि संजय राठोड हे आहेत. त्या दोघांमुळे उमेदवारी कापली गेली आहे. पण, आमचं नातं आहे, ऋणानुबंध आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की पक्ष निर्णय घेतो तो आपण ऐकला पाहिजे म्हणून आम्ही आजपासून कामाला लागलो आहोत. तिकिटं कापल्या गेल्याचे दुःख मलाही आहे, भावनाताई यांना आहे; त्यांनाही मी विनंती करणार आहे आणि आम्ही एकदिलाने कामाला लागू", असे हेमंत पाटील म्हणाले.
- 06:20 PM • 04 Apr 2024शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून बीडमधून बजरंग सोनावणे यांना तर भिवंडी सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- 03:39 PM • 04 Apr 2024'हेमंत तसा चांगला आहे...', तिकीट कापल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन!
- मला देखील आपल्याला भेटायचं होत, आधी हिंगोली मध्ये होतो.
- हिंगोलीमध्ये महायुतीच्या सर्वांनी शिफारस केलेल्या बाबुराव यांचा फॉर्म भरला.
- प्रत्येक ताईला माहेरचा ओढा असतो. माहेरवाशीण म्हणून त्या उमेदवार म्हणून आल्या आहेत.
- माहेरच्या मायेने सर्व मतदार आपल्या लेकीला निवडून देतील.
- राजश्री धडाडीच्या नेत्या आहेत. धडाकेबाज बोलतात.
- इतिहासात अनेक योजना आपण सुरू केल्या.
- हेमंत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं आहे.
- आपल्याला खासदार व्हायला थोडा उशीर झाला, हेमंत तसा चांगला आहे. त्याने अनेक कामं केली.
- इथल्या खासदार यांनी अनेक काम केली. त्यांच्या कामांचा फायदा जयश्री यांना होईल.
- एकनाथ शिंदे कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. भावना गवळी यांचा भाऊ म्हणून सांगतो त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
- सरकार यायच्या आधी अनेक योजना बंद केल्या. आम्ही सर्व बंदी उठवल्या सगळे विकास प्रकल्प सुरू केले.
- १२ हजार रुपये आज शेतकऱ्यांना मिळत आहेत. तरुणांसाठी नोकरभरती सुरू केली. हे सरकार आपल आहे अस सगळ्यांना वाटतंय. हे फेसबुक वर नाही तर फेस टू फेस काम करणारं सरकार आहे.
- 02:51 PM • 04 Apr 2024गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश!
काँग्रेसचा राजीनामा देणारे गौरव वल्लभ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. त्यांच्यासोबत बिहार काँग्रेसचे नेते अनिल शर्मा आणि RJD नेते उपेंद्र प्रसाद यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर गौरव वल्लभ म्हणाले की, 'मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून माझ्या मनातील सर्व भावना त्यामध्ये व्यक्त केल्या आहेत.'
- 01:29 PM • 04 Apr 2024'अबकी बार 400 पार आणायचं असेल तर...', CM एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
'आपल्याला पंतप्रधान म्हणून पुन्हा मोदीजींना आणायचं आहे. तसंच अबकी बार 400 पार आणायचं असेल तर, राज्यात अबकी बार 45 पार आणावं लागेल. त्याचबरोबर बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हिंगोलीतील उमेदवारीबद्दल शिंदेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, 'हेमंत पाटील यांच्या माध्यमातून औंढा नागनाथ तालुक्यातील लिगो इंडिया हा 2,600 कोटी रूपयांचा प्रकल्प आपण करतोय. हिंगोली वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आपण दिलेलं आहे. त्याला 100 कोटी रूपये आपण दिलेले आहेत. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज आणि त्याला 430 खाटांचं हॉस्पिटल त्याला 485 कोटी रूपये आपण मंजूर केले आहेत.' असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीतील सभेत म्हणाले.
- 01:18 PM • 04 Apr 2024वंचित स्वत:मुळे मविआपासून दूर- संजय राऊत
वंचित बहुजन आघाडी स्वत:हामुळे महाविकास आघाडीपासून दूर झाली आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली.
- 12:13 PM • 04 Apr 2024जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा
जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालेला आहे. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. न्यायाधीश जे.के. माहेश्वरी, संजय करोल यांच्या खंडपीठाचा हा निर्णय आहे.
- अमरावती अनुसूचित जाती राखीव जागेवरून 2024 लोकसभा निवडणुकीसाठी राणा यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा.
- नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत.
- हायकोर्टाने निष्कर्ष काढला की त्या 'शीख-चर्मकार' जातीच्या असल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते.
- नवनीत कौर राणा यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
- अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघाचे स्वतंत्र खासदार प्रतिनिधीत्व करतात.
- 8 जून 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की, नवनीत राणांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मोची जात प्रमाणपत्र मिळवले होते.
- यावेळी हायकोर्टाने त्यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.
- 11:35 AM • 04 Apr 2024Lok Sabha election : एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली -संजय राऊत
शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली. राऊत म्हणाले, "ज्यांची उमेदवारी कापण्यात आली, त्यांना प्रश्न विचारा. नाशिक, रामटेक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम अजून ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये उमेदवार देऊ शकले नाही. जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ते आपल्या भागाचे उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही. स्वतः मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली आहेत म्हणून ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात, आगे आगे देखो होता है क्या", अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
- 09:58 AM • 04 Apr 2024Lok Sabha election 2024 : तिघांचा पत्ता कट, शिंदेंचे खासदार टेन्शनमध्ये
महायुतीमध्ये शिवसेनेला किती जागा मिळणार, हे स्पष्ट होण्या आधीच शिवसेनेच्या विद्यमान तीन खासदारांचा पत्ता कट झाला. त्यामुळे सध्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेला एक खासदार आणि दुसऱ्या एका मतदारसंघातील एक खासदार टेन्शनमध्ये आले आहेत.
कृपाल तुमाने, भावना गवळी, हेमंत पाटील यांची तिकिटे शिवसेनेकडून कापण्यात आली. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले धैर्यशील माने यांचेही टेन्शन वाढले आहे. त्यांची उमेदवारी मागे घेऊन दुसरा उमेदवार देण्यास भाजपने शिंदेंना सांगितले आहे.
दुसरीकडे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यांच्या मतदारसंघात छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या खासदारांचे काय होणार, हा प्रश्न राज्यात चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT