Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंचं भर पावसात भाषण..

मुंबई तक

23 Apr 2024 (अपडेटेड: 23 Apr 2024, 11:01 PM)

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा...

उद्धव ठाकरेंची पावसातील सभा

उद्धव ठाकरेंची पावसातील सभा

follow google news

Lok Sabha Election Live News : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याबरोबरच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व पक्षाचे राजकीय नेते महाराष्ट्रभर फिरत असून, राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. उमदेवारही रात्रीचा दिवस करत प्रचारात दंग झाले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणे जुळत आहेत.

लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील घटनांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी वाचा लाईव्ह अपडेट्स...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:37 PM • 23 Apr 2024
    उद्धव ठाकरेंनी केलं भर पावसात भाषण..

    शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (23 एप्रिल) परभणीत जाहीर सभा घेतली. संजय जाधव यांच्या प्रचारासाठी परभणीत जाबीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, याचवेळी अचानक पावसाला सुरुवात झाली. पण त्याच पावसात उद्धव ठाकरेंनी भाषण करत आपली सभा पार पाडली. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेच्याही आठवणी अनेकांकडून जागवल्या जात आहेत. 

  • 05:06 PM • 23 Apr 2024
    'शाहांच्या सभेला परवानगी नाहीच', बच्चू कडूंनी चांगलंच ठणकावलं!

    'उद्या आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार. आमच्या सभेला परवानगी तरीही आमची सभा रद्द का? 1 लाखाच्या संख्येनं उद्या आम्ही इथं येऊ. परवानगी असतानाही आम्हाला का रोखलं जातंय? सुरक्षेचं कारण सांगून सभा रद्द कशी करता? पोलीस यंत्रणेचा वापर करू आचारसंहित्चा भंग केला. कायदा शिल्लकच राहिला नाही आहे. 23 आणि 24 तारखेसाठी आमच्याकडून मैदान बुक करण्यात आलं आहे.' अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • 04:25 PM • 23 Apr 2024
    Aaditya Thackeray : "येताय की टाकू तुरुंगात, मग ते लगेच रडायला लागले"

    मावळचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी झालेल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केला. ते काय म्हणाले वाचा?

    "हे जे मिंधे आहेत मुख्यमंत्री म्हणून... घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आपल्या डोक्यावर बसलेत. त्यांना ऑफर दिली होती की ज्वॉइन ऑर जेल (आमच्यासोबत या किंवा तुरुंगात जा). त्यांचं कॅशचं (पैशाचं) गोडाऊन सापडलं होतं. इन्कम टॅक्सची धाड पडली होती."

    "त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये (तुरुंगात) मग ते लगेच रडायला लागले. दाढी खाजवत. मग 20 मे ला उद्धव साहेंबाना वर्षा बंगल्यावर येऊन त्यांनी सांगितलं होतं की, हे मला धमकावत आहेत. जेलमध्ये जाण्याचं माझं हे वय नाही. मी काय करू साहेब, हे मला आत टाकतील. तुम्ही काहीतरी करा. भाजपसोबत चला. आम्ही आत जाऊ. हे सगळं रडगाणं तिथे झालं", असे 

    "भाजपची पॉलिसी असते खोटं बोला पण रेटून बोला. मिंधे गँगची पॉलिसी आहे की, खोटं बोला पण रडून बोला. एवढाच फरक आहे दोघांमध्ये. खोटं बोलतच असतात", असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 01:42 PM • 23 Apr 2024
    Maharashtra Live : फडणवीसांच्या जवळचा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादी करणार प्रवेश

    महाराष्ट्रात सध्या नेत्यांच्या पक्ष बदलण्याचा सपाटा सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्यात विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांनासोबत जात भाजपला धक्का दिला. त्यानंतर आणखी एका नेत्याने भाजपला रामराम केला आहे. मोहोळ तालुक्यातील भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी भाजपमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचेही जाहीर केले. 

    "गेल्या दहा वर्षात मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. भाजपकडून आजपर्यंत मला कधीच निधी दिला गेला नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला मुंबईत गेल्यानंतर आम्हाला तीन-तीन दिवस भेट मिळू शकली नाही. शेवटी तीन ते चार दिवस मुंबईत राहून परत मोहोळला यायचो. मतदारसंघातील 140 गावांचा दौरा केला. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला", क्षीरसागर म्हणाले. 

    संजय क्षीरसागर हे फडणवीसांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जातात. पण, पक्षाकडून त्यांना डावललं असल्याची चर्चा सुरू होती. 2009 पासून मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली. 

    2014 मध्ये भाजपकडून संजय क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना 53 हजार 753 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांचा 8 हजार 337 मतांनी विजय झाला होता. मोहोळ तालुक्यात राजकीय प्रभाव असलेल्या क्षीरसागरांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपला धक्का दिला आहे. 

  • 12:51 PM • 23 Apr 2024
    Lok Sabha Election Live : "ठाकरेंची शिवसेना 13 पेक्षा जास्त जागा जिंकणार"

    लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दावे-प्रतिदावे सुरू असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारेंनी ठाकरेंची सेना किती जागा जिंकणार, याचा आकडा सांगितला. 

    "लोकसभा किंवा विधानसभा लढवण्याची माझी तयारी नाही. मी कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. कोणत्याही जात, धर्मात न गुंतता, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची लढाई शिवसेनेला लढायची आहे. त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यामुळे विधानसभा माझ्या डोक्यात नाही. लोकसभेला ठाकरेंची शिवसेना 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल", असे त्या म्हणाल्या. 

  • 09:45 AM • 23 Apr 2024
    Lok Sabha election : शिंदेंची 'या' नेत्यांनी रात्री घेतली भेट, कुणाला मिळणार तिकीट?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी रात्री तीन नेत्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेले हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांनी भेट घेतली. त्याचबरोबर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ज्यांचं नाव चर्चेत आहे, त्या आमदार रवींद्र वायकर यांनीही शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे या तिघांपैकी कुणाला तिकीट मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

  • 08:31 AM • 23 Apr 2024
    Maharashtra News : "लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या...", आव्हाडांची पोस्ट

    लोकसभा निवडणूक सुरू असून, सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 

    जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट जशीच्या तशी

    "लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या... सुरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सुरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला."

    "यानंतर भाजप उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. (की मागे घेण्यास भाग पाडले गेलं?) आणि मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना 'बिनविरोध' विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोग वारंवार सांगतो की सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु तेदेखील सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती." 

    "हे 'मॅच फिक्सिंग' आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत कारण सध्या ते बिथरले आहेत. दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काही नाही. भाजपच्या उमेदवारांचे तर काहीच कर्तृत्व नाही. मोदींकडे निवडणूक सभांमध्ये बोलण्यासाठी काही नाही म्हणून ते हिंदू-मुसलमान या मुद्याकडे वळले आहेत." 

    "उमेदवारी भरण्याच्या पातळीवरच सर्व यंत्रणा मॅनेज करूनच ही लोकं '४०० पार'चा नारा देत आहेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे."

  • 08:19 AM • 23 Apr 2024
    Maharashtra Lok Sabha election 2024 : वंचित बहुजन आघाडीने वाढवलं भाजपचं टेन्शन

    लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्या दोन मतदारसंघात महायुतीबरोबर आणि महाविकास आघाडीलाही धक्का बसला आहे. 

    सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला पहिला झटका बसला. विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आता चंद्रहार पाटलांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. 

    दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे राम सातपुते आणि भाजपचे टेन्शन वाढले आहे. 

    महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघात एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. पण, संविधानाच्या संरक्षणाचे काम करेल अशा उमेदवाराच्या पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही गोष्टही प्रणिती शिंदेंना दिलासा देणारी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राम सातपुते यांची लढाई गेल्या काही दिवसात अवघड झाली आहे. 

follow whatsapp