Lok Sabha election 2024 Live updates in marathi : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राजकीय कुरघोड्याही सुरू असून, यासंदर्भातील अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी (Maharashtra Politics Live Updates)
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:00 PM • 12 Apr 2024Baramati Lok Sabha election 2024 : "...तर सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही", भाजप आमदाराचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे भाजपची धडधड वाढली आहे. निंबाळकरांनी उमेदवार बदलण्याची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मते कमी पडली तर जबाबदार राहणार नाही, असेही म्हटले आहे.
त्यानंतर आज (१२ एप्रिल)भाजपचे आमदार राहुल कुल यांनी थेट इशारा दिला. "माढा लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर आमच्याविरोधात काम करणार असतील, तर बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मदत करणार नाही", असे राहुल कुल म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे माढ्याच्या जागेवरून लढण्यास इच्छुक होते. तर दुसरीकडे भाजपकडूनच धैर्यशील मोहिते पाटील यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती.
दरम्यान, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामु्ळे धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपविरोधात बंड करत पक्षाचा राजीनामा दिला. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत.
त्यातच रामराजे नाईक निंबाळकर यांनीही असहकार्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयाचा मार्ग खडतर बनलेला आहे.
- 05:35 PM • 12 Apr 2024Lok Sabha election 2024 : धैर्यशील पटील यांच्या राजीनाम्यामुळे बावनकुळे नाराज
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला. हा भाजपसाठी झटका असल्याचे म्हटले जात आहे. मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळालेला असून, त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला आहे. मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही कोठेही कमी पडलो नाही. त्यांची मान, प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा राजीनामा देणं योग्य नव्हतं", असं बावनकुळे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. शरद पवारांनी टाकलेला हा डाव वगैरे म्हणत नाही. आमच्याकडे दररोज हजारोंनी पक्षप्रवेश होत आहेत", असंही बावनकुळे ते म्हणाले.
- 03:24 PM • 12 Apr 2024Baramati Lok Sabha election 2024 : शरद पवारांचं बोलणं मला बिलकुल आवडलेलं नाहीये -अंजली दमानिया
सुनेत्रा पवार यांचं नाव न घेता शरद पवारांनी केलेल्या एका विधानावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार... यात त्यांना काय म्हणायचं आहे? एखादी सून जर ती ४०-५० वर्ष लग्न होऊन झालेले असले, तरी ती घरची होत नाही. ती बाहेरचीच राहते. हे कितपत योग्य आहे? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
"शरद पवारांकडून राज्यातल्या सर्व सूनांचा अपमान...!!! सावित्री, येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या कर्तृत्वनान स्त्रियांचा हा अपमान आहे... आपल्या सारख्या 'जाणत्या' राजकारण्याकडून ही अपेक्षा नक्कीच नाही", असे म्हणत शितल म्हात्रे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
'मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे', असं शरद पवार गुरुवारी (११ एप्रिल) पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
- 12:22 PM • 12 Apr 2024lok Sabha 2024 : सांगलीत नवा ट्विस्ट, विशाल पाटील काय करणार?
सांगलीची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुटली. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील नाराज आहेत. दुसऱ्या पर्यायांची चाचपणी विशाल पाटलांकडून सुरू आहेत. त्यातच या मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.
विशाल पाटील हे २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढले होते. यावळी काँग्रेसला जागा न मिळाल्याने त्यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पर्याय खुला असल्याची चर्चा होती.
मात्र, स्वाभिमानी शेतकीर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विशाल पाटलांना धक्का देत उमेदवार जाहीर केला आहे. संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी दिली आहे. आता विशाल पाटील वंचित, ओबीसी महासंघाचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.
- 12:04 PM • 12 Apr 2024Lok Sabha election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात कशी बदलली समीकरणे?
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील राजकारण कसं बदलणार आहे, हे समजून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.
- 11:17 AM • 12 Apr 2024Lok Sabha election 2024 : नितेश राणेंचा सरपंचांना दम
भाजपचे आमदार नितेश राणे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नितेश राणे यांनी सरपंच आणि कार्यकर्त्यांना दम दिला.
नितेश राणे म्हणाले की, "सरपंचांसह कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावावी. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसा लीड मिळाला नाही, तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र माझी तक्रार करू नका", असे त्यांनी सांगितले.
- 09:43 AM • 12 Apr 2024Madha lok Sabha : धैर्यशील मोहिते पाटलांचा निर्णय झाला! भाजपला केला राम राम
अखेर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती स्पष्ट झाली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर आपला निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनाम्यामध्ये म्हटले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने माढा आणि सोलापूर मतदारसंघातील राजकीय गणितं बदलली आहेत. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनीही धैर्यशील मोहिते पाटलांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे.
धैर्यशील मोहिते पाटलांना मदतीची गरज असताना त्यांना साथ द्यायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची मानसिकता झाल्याचे उत्तम जानकर यांनी म्हटले आहे.
माळशिरस मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्तम जानकर इच्छुक आहेत. भाजपने येथून राम सातपुते यांना उमदेवारी दिली होती. ते आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आणि रामराजे नाईक निंबाळकर हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात असल्याने येथील सगळी समीकरणं बदलताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपसमोर अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT