Lok Sabha election Maharashtra Live News : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दावे करत विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. या सगळ्यासंदर्भातील ताजे अपडेट्स वाचा... (Maharashtra Lok Sabha election Latest Live News)
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 10:19 PM • 21 Apr 2024Uddhav Thackeray : "संपलाय ना उद्धव ठाकरे, मग का...", थेट मोदींना सवाल
बुलढाणा येथे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, "गेल्यावेळी आम्ही शिवसेना म्हणून तुमच्यासोबत होतो. शिवसेना सोबत होती, त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात कितीवेळा प्रचाराला आला होतात. तीन-चार सभा घेतल्या असतील. पण, आज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जाव लागतंय, दारोदारी भटकावं लागतंय. मतांची भीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागतेय. कारण तुम्ही आजपर्यंत कुणीही केलं नाही, ते पाप गद्दारांकडून करून घेतलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लावण्याचं पाप गद्दारांकडून करून घेतलं."
"उद्धव ठाकरे... उद्धव ठाकरे... संपवलात ना तुम्ही... संपूर्ण मोदींपासून, शाहांपासून देशातील संपूर्ण भाजप माझ्या अंगावर येतोय. उद्धव ठाकरे... उद्धव ठाकरे. अरे एक साधा माणूस... त्याचा पक्ष चोरला... चिन्ह चोरलं... वडील चोरायचा प्रयत्न केलात, पण अजून जनता तुमच्यासोबत येत नाही. त्याला मी काय करू. तुमचं पाप आहे ते. संपवताय ना उद्धव ठाकरेला... संपलाय ना उद्धव ठाकरे, मग का महाराष्ट्रात येताहेत. सोडून द्या.", असे आव्हानही ठाकरेंनी मोदींना दिलं.
"म्हणे माझी नकली शिवसेना. नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो. नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना. याच शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला दोन वेळा पंतप्रधानपदावर बसवण्यासाठी मरमर मेहनत केली. आज तुम्ही त्यांना नकली शिवसेना म्हणता. नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?", असं टीकास्त्र ठाकरेंनी मोदींवर डागलं.
- 05:40 PM • 21 Apr 2024मुंबईत भाजप कार्यालयाला आग!
भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. भाजपच्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात ही आग लागली असून किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. या कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रचाराचं साहित्य असल्याने ते आगीमध्ये जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- 02:55 PM • 21 Apr 2024Dindori Lok Sabha : दिंडोरीसाठी वंचितचा उमेदवार ठरला! नाव केलं जाहीर
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब केलं. वंचित मालती थविल यांना तिकीट दिलं आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भारती पवार या विजयी झाल्या होत्या. त्यांना 5 लाख 67 हजार 470 इतकी मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनराज महाले यांना 3 लाख 68 हजार 691 इतकी मते मिळाली होती.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाच्या जीवा गावित यांना 1 लाख 9 हजार 570 मते मिळाली होती. वंचितचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता. वंचितच्या बापू बरडे यांना 58 हजार 847 मते मिळाली होती.
- 12:28 PM • 21 Apr 2024Maharashtra Lok Sabha election Live : आंबेडकरांनी मावळ, शिरूर लोकसभेसाठी जाहीर केले उमेदवार
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने मावळ लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले. शिरूरमधून आफताब अनवर मकबूल शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना 6 लाख 35 हजार 830 इतकी मते मिळाली होती. शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेनेचे उमेदवार होते) यांना 5 लाख 77 हजार 347 इतकी मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्या राहुल ओहळ यांना 38 हजार 70 मते मिळाली होती.
मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून माधवी जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे. मावळमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे, तर ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता वंचितने उमेदवार दिल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असे चित्र आहे.
2019 मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना 7 लाख 20 हजार 663 मते मिळाली होती. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांना 5 लाख 4 हजार 750 इतकी मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्या राजाराम पाटील यांना पाऊण लाख म्हणजेच 75 हजार 904 इतकी मते मिळाली होती.
- 11:37 AM • 21 Apr 2024पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं - संजय राऊत
देशाचं नेतृत्व करण्यासाठी इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत. उद्धव ठाकरे देखील देशाचं नेतृत्व करू शकतात. पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं. नेत्याचं नाव घेतल्याने मिरची लागण्याचं कारण नाही. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
- 11:16 AM • 21 Apr 2024पुण्यात आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
खडकवासला विधानसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांचं निवडणूक प्रचार कार्यालय उभरण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या हस्ते होणार सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाच उद्घाटन होणार. भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील उद्घाटन कार्यक्रमला राहणार उपस्थिती लावणार. नवले पूल परिसरात हे नव कार्यालय असणार.
- 10:02 AM • 21 Apr 2024'चार जून नंतर त्यांची झोप उडेल', विनायक राऊतांची राणेंवर टीका!
'माझं डिपॉझीट जप्त करणार बोलून जर त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे. चार जून पर्यंत त्यांना चांगली झोप लागेल. चार जून नंतर त्यांची झोप उडेल,' अशी टीका विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
- 09:03 AM • 21 Apr 2024कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात आज हलक्या पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी गारपिटीसह मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT