Lok Sabha Election 2024 Bhandara-Gondiya: भंडारा-गोंदिया: ज्या मतदारसंघातून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. जिथून डॉ. श्रीकांत जिचकार पराभूत झाले, त्यानंतर केंद्रात मंत्री असलेले प्रफुल पटेल देखील पराभूत झाले. त्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला इथं निवडणूक होतेय आणि सध्या इथे प्रचाराचा धुरळा सुरु आहे. तब्बल 18 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप, काँग्रेस, वंचित, बसपासह अपक्ष आणि बंडखोरांमुळं ही निवडणूक रखरखत्या उन्हासारखीच सध्या खूपच तापली आहे. (lok sabha election 2024 reputation of praful patel and nana patole is at stake whose problems will the rebels increase in bhandara gondia lok sabha constituency)
ADVERTISEMENT
यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे सर्वात खास वैशिष्ट्य असे की जवळपास 25 वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह ईव्हीएम मशीनवर दिसणार आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच लोकसभा निवडणूक लढवत होती. त्यामुळे काँग्रेसला इथं संधी मिळाली नव्हती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटासोबत आहेत. आता भाजपसोबत अजित पवार गट असल्याने भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उतरवलं आहे. हे दोघे जरी प्रमुख उमेदवार मानले जात असले तरी वंचितचे संजय केवट यांच्या भाजपमधून बाहेर पडून बसपाकडून मैदानात उतरलेले संजय कुंभलकर आणि अपक्ष सेवक वाघाये हे देखील या निवडणुकीत प्रभाव टाकत आहेत.
आता प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात असताना इथली परिस्थिती काय आहे, बंडखोर कुणाचा गेम बिघडवणार, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर काय आव्हानं आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पडोळे मैदानात असले तरी इथली खरी लढत आहे ती प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्यात. प्रत्यक्ष मैदानात नसले तरी पटोले आणि पटेल यांच्यातली राजकीय लढाई हीच या मतदारसंघाची आताची खरी ओळख म्हणावी लागेल.
हे ही वाचा>> Opinion Poll : काँग्रेसला 15 ते 17 जागा, भाजपला बसणार जबर फटका?
तब्बल 25 वर्षांनी इथे काँग्रेसचा उमेदवार मैदानात आहे. 25 वर्षांपूर्वी डॉ. श्रीकांत जिचकार हे काँग्रेसचे या मतदारसंघातील शेवटचे उमेदवार होते. जिचकार यांना भाजपच्या चुन्नीलाल ठाकूर यांनी पराभव केला होता. 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा भाजपच्या शिशुपाल पटले यांच्याकडून तीन हजार मतांनी पराभव झाला होता. तर २००९च्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांनी शिशुपाल पटले यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवून दिला होता.
2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर पटोलेंनी निवडणूक लढवत प्रफुल पटेलांचा पराभव केला होता. पटोलेंनी निवडून आल्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी दिली. मग 2018 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मधुकर कुकडेंच्या रुपाने मतदारसंघ परत मिळवला. 2019 मध्ये भाजपचे सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धेंचा पराभव केला. आता पुन्हा मेंढे मैदानात आहेत आणि त्यांच्यासोबत पटेलांचीही ताकद आहे. पण यावेळी बंडखोरांची आव्हानंही आहेत.
यावेळी 18 उमेदवार मैदानात आहेत. यात बसपाचे संजय कुंभलकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कुंभलकर आधी भाजपमध्ये होते. मधल्या काळात त्यांना नगराध्यक्ष पदाची आलेली संधी देखील पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे हुकली. आता लोकसभेची उमेदवारी मिळेल असे वाटत होते. मात्र सुनील मेंढेंनाच पुन्हा लॉटरी लागल्यामुळे कुंभलकर नाराज झाले आणि त्यांनी बसपाचा आधार घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. तेली समाज ही भाजपची व्होट बँक समजली जाते. त्यांच्यामुळे तेली आणि भाजपच्या मतांमध्ये थोडं तरी विभाजन होऊ शकतो आणि याचा फटका भाजपच्या सुनील मेंढेंना बसू शकतो.
दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये देखील अपक्ष म्हणून मैदानात आहेत. त्यांच्यामुळं काँग्रेसच्या पडोळेंना फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. इथं माजी आमदार चरण वाघमारे यांचा फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून चरण वाघमारे यांची अवहेलना केली गेल्याचे बोलले जात होतं. असं असलं तरी वाघमारेंचा प्रभाव पाहता भाजप आणि काँग्रेसने पुन्हा चरण वाघमारे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नाना पटोले यांनी वाघमारे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत झाले गेले विसरून आमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे अशी गळ घातली. आणि अखेर वाघमारेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळं वाघमारेंची ताकद मिळणं ही काँग्रेससाठी जमेची बाजू मानली जात आहे.
हे ही वाचा>> Lok Sabha 2024: 'हे' ओपिनियन पोल अन् BJPचं वाढलं टेन्शन
भाजप उमेदवार मेंढेंसाठी नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रफुल पटेलांच्या सभा झाल्यात, मेंढेंना मत म्हणजे मोदींना मत असं आवाहन करत जोरात प्रचार सुरुय. शिवाय परिणय फुकेदेखील नाराजी दूर सारुन त्यांच्या प्रचाराला लागले आहेत. इकडे पटोलेंची प्रतिष्ठा नव्या उमेदवारासाठी पणाला लागली आहे. 25 वर्षांनंतर पंजाच्या उमेदवारासाठी ते जीवाचं रान करत आहेत.
हा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागाला गेला आहे. त्यातील तीन भंडारा जिल्ह्यात तर तीन गोंदिया जिल्ह्यात. भंडाऱ्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत जे सध्या शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. गोंदियातही विनोद अग्रवाल अपक्ष आमदार आहेत जे सध्या भाजपसोबत आहेत. तुमसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे हे प्रफुल्ल पटेलांसोबत आहेत. अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे देखील प्रफुल्ल पटेलांसोबतच आहेत. तिरोड्याचे विजय रहांगडाले हे भाजपचेच आहेत. फक्त साकोली मतदारसंघ हा काँग्रेसकडे असून काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे इथले आमदार आहेत.
भंडारा गोंदियात वंचित आणि बसपाचा फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा असणार आहे. बसपचे उमेदवार संजय कुंभलकर आणि वंचितचे संजय केवट यांच्या मतविभाजनाचा फटका कुणाला बसतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण 2019 मध्ये वंचितच्या उमेदवाराने 45 हजार 842 तर बसपच्या उमेदवाराने 52 हजार 659 मते घेतली होती.
प्रचार आता शिगेला पोहोचलाय. अशावेळी या लढतीत सुनील मेंढे मतदारसंघ पुन्हा राखणार का, की दीर्घकाळानंतर काँग्रेसचा खासदार भंडारा-गोंदियातून दिल्लीला जाणार याचे उत्तर 4 जूनलाच मिळणार आहे.
ADVERTISEMENT