Lok Sabha Election 2024: 'आमच्या गावरान मराठीमध्ये बोलणारा...', पवारांनी सुजय विखेंना 'असं' घेरलं!

रोहित गोळे

• 06:45 PM • 25 Apr 2024

Sharad Pawar Criticized Sujay Vikhe: इंग्रजीवरून निलेश लंके यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप उमेदवार सुजय विखेंना आता शरद पवार यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले.

'इंग्रजी बोलतो म्हणून मी फार शहाणा झालो असं काही समजायचं काही कारण नाही. ते तुमचं इंग्रजी तुमचं तुम्हाला लखलाभ..'

'इंग्रजी बोलतो म्हणून मी फार शहाणा झालो असं काही समजायचं काही कारण नाही. ते तुमचं इंग्रजी तुमचं तुम्हाला लखलाभ..'

follow google news

Sharad Pawar Sujay Vikhe English and Nilesh Lanke: अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या निमित्ताने शरद पवारांनी भाजप आणि विखे-पाटलांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. निलेश लंकेंवर भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी टीका करताना म्हटलं होतं की, 'त्यांनी एक वाक्य इंग्रजीमध्ये बोलून दाखवावं.. तर मी माझा उमेदवारी अर्जही भरणार नाही..' पण आता त्यांच्या या टीकेला स्वत: शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. (lok sabha election 2024 sharad pawar gave a sharp reply to bjp candidate sujay vikhe who criticized nilesh lanke over english language)

हे वाचलं का?

'ते तुमचं इंग्रजी तुमचं तुम्हाला लखलाभ..', असं थेट म्हणत शरद पवार यांनी संसदेत भाषेची कोणतीही अडचण येत नाही असं म्हणत सुजय विखेंना घेरलं. निलेश लंके यांच्या प्रचारानिमित्त शरद पवार यांनी आज अहमदनगरमध्ये सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

'आम्हाला आमच्या गावरान मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा..' पाहा पवार नेमकं काय म्हणाले.. 

'आज या निवडणुकीत आपल्या सर्वांच्या वतीने उमेदवार असा दिलाय तो दिसायला फाटका आहे.. दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. पण काय गडी आहे.. निवडून होऊ द्या मग दावील त्यांचं... आज उत्तम प्रकारची व्यक्ती तुमच्यासमोर सादर केली. जी काही संकटं आहेत ती संकटं दूर करण्याची ताकद या फाटक्या माणसामध्ये आहेत.'

हे ही वाचा>> "अरे भावा, नको या भानगडीत पडू", कदमांनी 'त्या' रात्री काय दिला मेसेज?

'सांगितलं जातं की, कोणत्या भाषेत बोलणार.. मघाशीच मी सांगितलं की, संसदेत 18 भाषेत बोलता येतं. तिथे 18 भाषेचे अनुवादक असतात. कानाला मशीन लावता येतं. मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो, तामिळनाडूचा माणूस असो.. काश्मिरचा माणूस असो.. त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं.. मंत्र्यांना, पंतप्रधानांना देखील सांगितलं झालं.' 

'त्यामुळे मी इंग्रजी बोलतो म्हणून मी फार शहाणा झालो असं काही समजायचं काही कारण नाही. ते तुमचं इंग्रजी तुमचं तुम्हाला लखलाभ.. आम्हाला इथे फाटका माणूस.. पण फाटक्या समाजाच्या हिताची जपणूक करणारा आणि मराठीमध्ये आणि अगदी आमच्या गावरान मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आहे.. आणि तो आज याठिकाणी निलेशच्या रुपाने तुम्हा सगळ्यांना दिलाय.. त्यांना मोठ्या मताने विजयी करा.. त्यांची खूण तुतारी वाजवणारा माणूस..' असं म्हणत शरद पवारांनी सुजय विखे यांचा समाचार घेतला. 

तुतारी चिन्हावरूनही पवारांनी मतदारांना केलं सावध...

दरम्यान, आपल्या तुतारी या नव्या निवडणूक चिन्हाबाबत देखील शरद पवार यांनी मतदारांना सतर्क केलं. 

'निलेश लंके यांना मोठ्या मताने विजयी करा.. त्यांची खूण तुतारी वाजवणारा माणूस ही आहे.. पण त्याच्यातही या लोकांनी घोटाळा केलाय लक्षात ठेवा.. हे लोकं घोटाळे करण्यात फार हुशार आहेत. त्यांनी आणखी एक माणूस बीडचा उभा केलाय.. त्याला फक्त तुतारी चिन्ह दिलं. फक्त तुतारी.. माणूस नाही..'

हे ही वाचा>> माढ्यात पवारांची ताकद वाढली, आणखीण एक धनगर नेता राष्ट्रवादीत

'आपली खूण काय तुतारी वाजवणारा माणूस.. माणूसही पाहिजे, तुतारीही पाहिजे.. यांनी काय निशाणी दिली फक्त तुतारी.. फक्त तुतारीचा आवाज दिल्लीला पोहचणार नाही.. दिल्लीला आवाज पोहचायचा असेल तर ती तुतारी फुंकली पाहिजे.. त्यासाठी माणूस पाहिजे. म्हणून तुतारी वाजवणारा माणूस ही खूण निलेश लंकेंची आहे.. त्याला मोठ्या मताने विजयी करा..' असं म्हणत शरद पवारांनी तुतारी या चिन्हाबाबत सध्या जे राजकारण सुरू आहे त्याविषयी मतदारांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला.

 


 

    follow whatsapp