Maharashtra Lok Sabha election 2024 live Update : लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस शिल्लक असून, प्रचाराचा पारा वाढला आहे. महाविकास आघाडीने जागावाटपाची घोषणा करत सांगली, भिवंडीच्या जागेचा संभम्र दूर केला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही काही जागांचा तिढा कायम असल्याने जागावाटप निश्चित झालेले नाही. राज्यातील राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलत असून, या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स वाचा... (Lok Sabha election Maharashtra latest News)
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:35 PM • 10 Apr 2024काँग्रेसने जाहीर केली त्यांची चौथी यादी, धुळे आणि जालनाचा उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणूक 2024: महाराष्ट्रासाठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी धुळे आणि जालना या दोन जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने धुळ्यातून शोभा बच्छाव आणि जालन्यातून कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे.
- 04:50 PM • 10 Apr 2024निर्णयाचा फेरविचार करा; विश्चजित कदमांची मविआ नेत्यांना विनंती
"महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यात आले. उमेदवारही जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने माझी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना नम्र विनंती आहे की, सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि राजकीय परिस्थिती काय आहे, याची पुन्हा एकदा त्यांनी पारख करावी, माहिती घ्यावी. माहिती घेऊन जर या निर्णयाबद्दल काही फेरविचार करता येत असेल, तर फेरविचार करावा ही विनंती आहे", असे विश्वजित कदम म्हणाले.
- 04:46 PM • 10 Apr 2024Sangli Lok Sabha : आम्हाला ही जागा मिळावी, पुन्हा एकदा विचार करा -विश्वजित कदम
- जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन ही पत्रकार परिषद घेत आहोत.
- महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची महाविकास आघाडी आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी एकत्रित आलेलो आहोत.
- जातीयवादी भाजपला सरकारला... ज्यांनी सत्तेत आल्यापासून अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत.
- बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अत्याचार असे अनेक प्रश्न आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडी आहे.
- लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोर जाण्यासाठी मविआची तीन महिन्यांपासून जागावाटपाची चर्चा सुरू आहे.
- सांगलीतील कार्यकर्ते, इथला काँग्रेसचा इतिहास पाहता, तो काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. ही जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही सगळेजण आमच्या भावना राज्यातील आणि केंद्रातील पक्षश्रेष्ठीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
- ज्या बैठका पक्षातील नेत्यांसोबत झाल्या. त्यात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आदरणीय नेते उपस्थित होते. दिल्लीतील नेत्यांनाही भेटलो.
- सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, ही भावना आम्ही मांडली. त्याचं काऱण म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. एक सुमन पाटीलही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही काँग्रेसचे वर्चस्व आहे. काँग्रेसची बाजू मजबूत असल्याने जागेची मागणी केली.
-महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत जी परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापूरची शाहू महाराज छत्रपतींना लढवायची होती. त्यामुळे ती काँग्रेसला मिळाली. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
- राज्यातील नेत्यांनी हा निर्णय एकतर्फी होता, तो घटक पक्षांना विश्वासात घेऊन करण्याची गरज होती अशी भूमिका घेतली. ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे. संघर्षाच्या परिस्थितीत ते राजकारण करत आहेत, त्याबद्दल आम्हाला आदर आहे.
- 12:44 PM • 10 Apr 2024'मुलगी ही वंशाचाच नव्हे तर..', अजितदादांना शरद पवारांचं थेट उत्तर!
'पवार आडनाव असणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा', असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये नुकतेच केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही सडेतोड उत्तर दिले आहे. शरद पवारांचा जुना व्हिडीओ पोस्ट करत आडनावावरुन मतदानाचे आवाहन करणाऱ्या अजित पवारांना बुरसटलेल्या विचारांचं म्हटलं आहे.
'घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते... असा पुढारलेला विचार आदरणीय श्री. शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो. म्हणून महाराष्ट्र देशातील इतर राज्यापेक्षा वेगळा ठरतो. बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही !' असं ट्वीट करत त्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
- 12:33 PM • 10 Apr 2024रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातपडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. कोर्टाला पुढे चार दिवस सुट्टी असल्यामुळे आजच ही सुनावणी पार पडेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
- 12:23 PM • 10 Apr 2024Ashish Shelar : "यांच' बिनशर्त असतं आणि 'त्यांच' मुख्यमंत्री पद मागतं"
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेचे भाजपकडून स्वागत होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विडंबनात्म काव्य लिहून ठाकरेंना टोले लगावले आहेत, तर राज ठाकरेंचे कौतुक केले आहे.
शेलार म्हणतात...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
"यांच" आणि "त्यांच" सेम नसतं !काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धाप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
"यांच" बिनशर्त असतं
आणि "त्यांच" मुख्यमंत्री पद मागतं !
त्यासाठी
देव, देश आणि धर्मावर पाणी ही सोडत !
प्रेम..
"यांच" आणि "त्यांच" सेम नसतं !(कविवर्य मंगेश पाडगावकर यांची क्षमा मागून)
- 12:22 PM • 10 Apr 2024"एका बाजूने गाडीला पूर्ण घासत नेलं", पटोलेंनी सांगितला अपघाताचाच थरारक अनुभव
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने जोराची धडक दिल्याची घटना घडली. या अपघाताबद्दल आता पटोले यांनी माहिती दिली. "काल भंडाऱ्यात आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून धडक देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी एका बाजूने गाडीला पूर्ण घासत नेलं, आम्ही तर सुखरूप आहोत पण गाडीचं पूर्ण नुकसान झालं, जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे मी आज सुखरूप आहे. हा घातपात आहे का याचा पोलीस तपास करतील", असे नाना पटोले म्हणाले.
- 10:52 AM • 10 Apr 2024Maharashtra Breaking news : नाना पटोलेंच्या गाडीला ट्रकची धडक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली.
लोकसभा निवडणुकीमुळे नाना पटोले हे प्रचार दौऱ्यावर होते. प्रचार आटोपून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीला अपघात झाला.
भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी (९ मार्च) रात्रीच्या सुमारास प्रचार आटोपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून, नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत.
नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकने जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षीत आहेत.
- 08:33 AM • 10 Apr 2024Raj Thackeray : "आज वाघाची शेळी झाली", काँग्रेस नेत्याचा राज ठाकरेंना चिमटा
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या भूमिकेवर विरोधकांकडून टीका होत आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. ते म्हणाले, "राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले, त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. आज वाघाची शेळी झाली आहे. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून झुकले,हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही", असा टोला त्यांनी लगावला आहे.
- 08:19 AM • 10 Apr 2024Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात सभा
लोकसभा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशभरात सभा घेत आहेत. सोमवारी सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्यानंतर मोदींची विदर्भात आज दुसरी सभा होत आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघात मोदींची प्रचार सभा होत आहे. शिवसेनेचे राजू पारवे हे महायुतीचे उमेदवार या मतदारसंघात आहेत. त्यामुळे मोदी या सभेत कुणावर निशाणा साधणार हे महत्त्वाचं आहे.
तिन्ही उमेदवार काँग्रेसचे
या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे हे तिन्ही उमेदवार मूळ काँग्रेसी आहेत. राजू पारवे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक-दोन दिवस आधी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. दुसरे उमदेवार काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आहेत. तिसरे उमेदवार अपक्ष असून ते ही काँग्रेसचेच आहेत. किशोर गजभिये यांनी रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अपक्ष अर्ज भरला.
या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी अर्जही दाखल केला होता. पण, त्यांचे जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला, त्यामुळे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे उमेदवार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT