Maharashtra Lok Sabha Live : ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर निलंबित!

मुंबई तक

29 May 2024 (अपडेटेड: 29 May 2024, 02:57 PM)

Maharashtra Lok Sabha Election Live News : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या निकाल तोंडावर आला असून, सर्वच राजकीय पक्षांची आणि त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली आहे. त्यामुळे पडद्यामागे राजकीय घडामोडी घडत आहेत. यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स वाचा...

Mumbaitak
follow google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live : शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पण, त्यापूर्वीच बरेच अंदाज निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. 

तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले. दुसरीकडे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनेही वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधारी एनडीए आघाडीला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न केले.

महत्त्वाची बाब म्हणजे यावेळची लोकसभा निवडणुकी राष्ट्रीय मुद्द्यावर न होता स्थानिक मुद्दे आणि समस्यांवर झाली. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा कस लागल्याचे दिसले. असे असले तरी भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे अंदाज व्यक्त होत आहे. मात्र महाराष्ट्रासह काही राज्यात भाजपला जबर धक्का बसेल अंदाज आहेत. 

लोकसभ निवडणुकीच्या निकालाबद्दल विश्लेषक काय म्हणताहेत आणि इतर महत्त्वाचे अपडेटस् वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 02:53 PM • 29 May 2024
    Pune News : ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर निलंबित!

    पुणे अपघात प्रकरणी यंत्रणा आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी स्थानप करण्यात आलेल्या चौकशीसमितीने 48 तासात अहवाल सादर केला असून दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याचे निलंबन केले आहे. डॉ. अजय तावरे हे ससुनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत तर, डॉ. श्रीहरी हळनोर हे या विभागात कार्यरत आहे. त्यांच्यासह एका शिपायालाही निलंबित करण्यात आलं आहे.

  • 02:09 PM • 29 May 2024
    Maharashtra News : तानाजी सावंतांची तक्रार करणारा अधिकारी अडचणीत!

    मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्यावरच कारवाई होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत, शासनाकडून पवार यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीचा खुलासा ३ दिवसात न केल्यास पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.'मंत्री तानाजी सावंत यांनी दबाव टाकून निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप' डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. 

     

  • 12:39 PM • 29 May 2024
    Pune Accident : "अजय तावरे, हळनोरच्या जिवाला धोका", अंधारे सांगितलं कारण

    "पोर्श कार प्रकरण, आरोग्य खात्याबाबत निकालानंतर खुलासे करेन. डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते." ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून संका व्यक्त केली जात आहे. "अजय तावरे, श्रीहरी हळनोरची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटतं. आर्यन ड्रग्स प्रकरणातील प्रभाकर साहिलचा संशयास्पद मृत्यू झाला.ललित पाटील प्रकरणात पुढची चौकशी काय झाली?" असे सवाल सुषमा अंधारेंनी यावेळी उपस्थित केले. "माझ्याकडे भरपूर नावं, मी कोणाला सोडणार नाही असं तावरे म्हणाले. पुरावे नष्ट करण्यासाठी तावरेच्या जिवाला धोका का होणार नाही? 2 डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे." असंही त्या यावेळी बोलल्या.    

  • 11:59 AM • 29 May 2024
    Pune Accident : पुणे अपघातासंबंधी सुषमा अंधारे कोणते खुलासे करणार?

    '4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोवर डॉ अजय तावरे च्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते.' असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ट्वीट करत म्हणाल्या आहेत.

  • 11:52 AM • 29 May 2024
    PM Modi News : "महात्मा गांधींना कुणी ओळखत नव्हतं, चित्रपटामुळे...", मोदी काय बोलले?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. 

    एबीपी न्यूज वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी महात्मा गांधींबद्दल विधान केले. 

    "महात्मा गांधी हे एक मोठे व्यक्तिमत्व होते. आपण त्यांची जगभरात ओळख निर्माण करायला हवी होती, ती आपली जबाबदारी होती. मात्र, त्यात अयशस्वी ठरलो. महात्मा गांधींना कोणी ओळखत नव्हते. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्या चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गाधी कोण? असे कुतूहल निर्माण झाले. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही", असे विधान मोदींनी केले. 

  • 11:52 AM • 29 May 2024
    Live News: आल्हाददायक वातावरणासाठी गोव्यातील समुद्रकिनारी लाखो पर्यटकांची गर्दी!

    एकीकडे संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट पसरली असताना गोव्यात मात्र पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे. उष्णतेने अंगाची लाही लाही होत असताना समुद्राच्या पाण्यात आंघोळ करून थंडगार विसावा घेण्यासाठी देशभरातून लाखो पर्यटक सध्या गोव्यात पोहोचले आहेत.
    सध्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची एकच गर्दी दिसून येत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा,चंद्रपूर यासह उत्तर भारतातून लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. वाढत्या गर्मीपासून दिलासा मिळवण्यासाठी समुद्र स्नान करणे हे  स्वर्गसुख असल्याच गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी सांगितले.
    गोव्यात सध्या उत्तर भारत, दिल्ली मुंबई विदर्भ मराठवाड्यातून पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीच्या गर्मीपासून बिझी लाईफ पासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही गोव्याचा पर्याय निवडतो, येथील नाईट लाईफ हे आमच्यासाठी स्वर्गसुख असल्याचं पर्यटकांनी सांगितलं.

  • 11:15 AM • 29 May 2024
    Maharashtra News : ठाण्यातील पब-डान्सबार पोलिसांच्या रडारवर

    पुण्यातील हिट ॲण्ड रन प्रकरणानंतर ठाण्यातील पोलीस यंत्रणा सावध झाली आहे. सर्व बार-रेस्टॉरन्ट, डान्स बार, पब आणि हुक्का पार्लरची तातडीने झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. दरम्यान अनेक तक्रारीनंतरही बेकायदा हुक्का पार्लर, पब्ज, डान्सबार यावर कारवाई करण्यास ठाणे महापालिका चालढकल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

     

  • 10:26 AM • 29 May 2024
    Maharashtra News : सांगलीत अपघात, कॅनॉलमध्ये कार पडल्याने सहा जणांचा मृत्यू

    तासगावच्या चिंचणी येथे एक कार कॅनॉलमध्ये पडून सहा जण ठार. तासगाव-मणेराजुरी मार्गावर चिंचणी जवळ मध्यरात्री अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून झाला भीषण अपघात. एकाच कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. मयत कुटूंब हे तासगावमधील आहेत.

     

  • 10:21 AM • 29 May 2024
    Maharashtra News: घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे आज कोर्टात राहणार हजर

    घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेची पोलीस कोठडी आज संपणार असून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. भावेश भिंडेला पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात येणार की, न्यायालयीन कोठडी मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.

  • 09:42 AM • 29 May 2024
    Lok Sabha Election 2024 : निकालाआधीच इंडिया आघाडीची मुंबईत बैठक

    १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडीची निकालाआधीच बैठक होणार आहे. 

    मुंबईमध्ये १ जून रोजी इंडिया आघाडीतील पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे हे परदेशात आहेत, त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असून, त्यांच्या पक्षाकडून इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

    या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालाबद्दल आणि विरोधकांच्या पुढच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर विधान परिषद निवडणुकीबद्दलही चर्चा होणार असल्याचे समजते.

  • 08:51 AM • 29 May 2024
    Maharashtra Lok Sabha Election 2024 : मित्रपक्षामुळे भाजपलाही फटका; महाराष्ट्रात जागा घटणार?

    २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्येही युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या.

    लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २३ जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. 
     
    यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. पण, राजकीय अभ्यासक आणि निवडणूक विश्लेषकांचे अंदाज भाजपची चिंता वाढवू लागले आहेत. 

    यावेळी भाजप २८ जागा लढवत आहे, तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मित्रपक्ष २० जागा लढवत आहेत. त्यांना फारसे यश मिळण्याची शक्यता नाही, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. महायुतीला २० जागांचा फटका बसेल, असा त्यांचा अंदाज आहे.

    ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सीएसडीएसचे संजय कुमार यांनीही महाराष्ट्रात भाजपच्या जागा घटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याबरोबर गुंतवणूकदार रुचीर शर्मा यांनीही महायुतीतील मित्रपक्षांना फार यश मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

    वाचा >> "महायुतीला 20 जागांचा फटका, मविआला...", यादवांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

  • 08:04 AM • 29 May 2024
    Pune Accident : पोर्श अपघात प्रकरणी डॉक्टर तावरेच्या घरी पोलिसांची धाड

    पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत होता हे सिद्ध होऊ नये म्हणून डॉक्टरांनी लाचेच्या लालसेपोटी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी  ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली. यादरम्यान आता प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी डॉ. अजय तावरेच्या घरी धाड टाकली आहे.

follow whatsapp