Maharashtra Live : शेअर मार्केट परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

मुंबई तक

07 Jun 2024 (अपडेटेड: 07 Jun 2024, 06:58 PM)

Maharashtra News Live updates : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकारणाची दिशा बदलली आहे. भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एनडीएतील मित्रपक्षांचे वजन वाढले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. यासंदर्भातील सर्व लाईव्ह अपडेट्स वाचा...

Mumbaitak
follow google news

Maharashtra Lok Sabha Live Updates : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. महाराष्ट्र भाजपला चांगले यश मिळाले नाही, त्यामुळे मित्रपक्षांना कंठ फुटल्याचे दिसत असून, शिंदेंच्या सेनेकडून भाजपवर खापर फोडले जात आहे. 

दुसरीकडे देशातही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे एनडीएतील मित्रपक्षांची मर्जी सांभाळण्याची कसरत करावी लागत असून, खातेवाटपावरून सध्या मित्रपक्षांकडून दबाव तंत्र सुरू आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम, नितीश कुमार यांच्या जदयू आणि एनडीएतील इतर मित्रपक्षांनीही चांगली खाती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, भाजपवर काही महत्त्वाची खाती सोडावी लागणार असे चित्र सध्या आहे. यासंदर्भातील अपडेट्स वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:12 PM • 07 Jun 2024
    Maharashtra news : शेअर मार्केट परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदेलोन

    काँग्रेस नेते राहुल गांधींनी काल पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या वक्तव्याचा हवाला देत शेअर मार्केटमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेअर मार्केट परिसरात आंदोलन केलं आहे. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांसोबत सुरू आहे. 

  • 01:02 PM • 07 Jun 2024
    PM Modi Live : मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ

    लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत नसलं, तरी एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. आज एनडीएतील सर्व घटक पक्षांची बैठक झाली. 

    या बैठकीत नरेंद्र मोदी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. 

    नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. रविवारी म्हणजे ९ जून रोजी हा शपथविधी सोहळा होणार आहे. नितीश कुमार यांनीच याची माहिती दिली. माझा आग्रह होता की, आजच शपथविधी व्हावा, पण मोदीजी रविवारी शपथ घेणार आहेत, असे ते सभागृह नेतेपदी निवडीच्या वेळी म्हणाले.

     

  • 10:33 AM • 07 Jun 2024
    Maharashtra News Live : "हे लोक राम मंदिरालाही विरोध करतील", संजय राऊत

    मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. खातेवाटपाची चर्चा सुरू असून, त्यावर संजय राऊतांनी खिल्ली उडवली आहे. 

    माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, "सरकार चालवताना नाकीनऊ येतील. मूळात एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे सगळ्यांचे आहेत. आज तुमचे आहेत, उद्या आमचे होतील. जदयूने अग्निवीर योजनेचा विरोध केला आहे. मोदी ज्या गोष्टी आणायचं सांगत होते, त्या सगळ्यांना विरोध केला आहे. उद्या हे लोक राम मंदिरालाही विरोध करतील."

    "मोदी सांगत होते की, काँग्रेस आणि इंडिया आघाडी  सत्तेत आली तर मुस्लिमांना आरक्षण देतील. मग चंद्राबाबू तर मुस्लीम आरक्षणाच्या बाजूने आहेत. मग आता तुम्ही काय करणार आहात? असे खूप सारे मुद्दे आहेत."

  • 08:45 AM • 07 Jun 2024
    Maharashtra News Live : शिवसेना भाजपवर नाराज, नेत्यांचे आरोप

    लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुतीसाठी धक्कादायक ठरले आहेत. भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता मित्रपक्षांचे महत्त्व वाढले आहे. महाराष्ट्रातही भाजपची कामगिरी चांगली राहिली नाही. त्यातच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपवर खापर फोडले जात आहे. 

    भाजपकडून सर्व्हेचे दाखले देत शिवसेनेचे उमेदवार बदलल्याचा मुद्दा आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपने उमेदवार बदलल्याने आणि शेवटपर्यंत जागावाटपाची चर्चा सुरू ठेवल्याने नाशिक, दक्षिण मुंबई, यवतमाळसह इतर काही जागांवर शिवसेनेचा पराभव झाल्याचे शिवसेनेचे नेते खासगीत बोलत आहेत. 

    लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांना जबाबदार धरले जात आहे. त्यातच आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग राणे विरुद्ध सामंत संघर्ष सुरू झाला आहे. नारायण राणे यांच्या विजयानंतर आता नितेश राणे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे किरण सामंत यांच्यानंतर उदय सामंत यांच्या मतदारसंघांचं काय होणार, हाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

    देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न

    लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सध्या फडणवीस यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजप नेत्यांकडून फडणवीस यांची भेटही घेण्यात आली. 

follow whatsapp