Maharashtra News Live : "मला जाऊदे ना घरी वाजले की बारा", राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

मुंबई तक

06 Jun 2024 (अपडेटेड: 06 Jun 2024, 10:47 AM)

Maharashtra Lok Sabha 2024 Live : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. महाराष्ट्रात आणि देशात काय सुरूये घडामोडी वाचा लाईव्ह अपडेट्स...

सरकारमधून बाहेर पडण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर राऊत काय बोलले?

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला.

follow google news

Maharashtra Lok Sabha 2024 live : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. देशात आणि महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला असून, तिसऱ्यांदा बहुमतावर सरकार स्थापन कऱण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहेत. 

असं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने देशातील राजकारणाची दिशा बदलली असून, महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने नजरेत भरणारी कामगिरी केली असून, महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये इनकमिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

अपेक्षाभंग करणारे निकाल आल्याने महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली असून, महायुतीतील नेतेच मित्रपक्षांकडे बोट करताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर घडत असलेल्या सर्व घटना घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 03:15 PM • 06 Jun 2024
    Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा, निलेश लंकेंच्या समर्थकाची फोडली गाडी!

    लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा झाला आहे. खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे. पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी  हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. मारहाणीत झावरे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

  • 01:56 PM • 06 Jun 2024
    Satara Lok Sabha 2024 : "सगळ्यांना वाटेल शशिकांत शिंदे संपला, पण..."

    सातारा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी त्यांचा पराभव केला. पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. 

    शशिकांत शिंदे निवडणूक निकालावर काय म्हणाले, वाचा सगळी पोस्ट जशीच्या तशी

    सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीला खरं म्हटलं तर माझा काही मताने पराभव झाला. आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेच मनापासून आभार व्यक्त करतो. मागच्या वेळी श्रीनिवास पाटील यांच्या निवडणुकीला पक्षाचे बरेच आमदार राष्ट्रवादीच्या बरोबर होते. त्याचवेळी विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होत्या. यावेळी कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव सोडलं तर बाकीच्या ठिकाणी कुठेही पहिल्या फळीतले नेते आणि आमदार नव्हते. तरीसुद्धा ही निवडणूक फार महाराष्ट्रामध्येच एक वेगळे प्रकारची बदलाचे वार करणारी निवडणूक होती.

     मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार बद्दल तीव्र नाराज होती. ज्याचं प्रतिबिंब मी ज्यावेळी फिरायचो, त्यावेळी पाहायला मिळायचं. जाईल तिथे तुतारी अशा प्रकारचा विषय चर्चेला होता. असं असताना मला सांगावसं वाटतं प्रामुख्याने या घडामोडी मध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या फळीचे कार्यकर्ते आणि जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे आपण काही मतांनी पराभव सामोर गेलो. तरी विशेषता वाई मतदारसंघ सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतल्याचा परिणाम पाहायला मिळाला. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं जिथे प्राबल्य आहे तिथे आम्हाला मताधिक्य मिळालं.

    जिथे जमिनीवर शक्य असणाऱ्या गावांमध्ये कोरेगाव मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळालाच पाहायला मिळाले पाटणमध्ये मनापासून काम करण्यात आले त्याबद्दल आभार मानेल सत्यजित पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार पाटणमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यामुळे अपेक्षित नसलेल्या पाटणमध्ये आम्हाला आघाडी मिळाली साताऱ्यामध्ये जे अपेक्षित केलं होतं त्यामध्ये मागच्या वेळी 45 हजारांच्या वर असलेल्या मताधिक्य यावेळेस घटलं. जावळी मधून सात ते आठ हजारांचे मताधिक्यघटून यामध्ये बळाचा वापर केला गेला, आर्थिक तसेच बोगस मतदान झाल्याची चर्चा आहे. तरीसुद्धा तिथल्या मतदारांनी सुक्तपणाने निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केल्यामुळे मताधिक्य थांबवण्यास यशस्वी झालो.

    यातील काही प्रमाणात सोडले तर बहुतेक मत ही तुतारीची मिळाली, अशा प्रकारची चर्चा आहे. बीडला पण तसेच झाले, माढा मतदारसंघात पण तसेच झाले अशा प्रकारची मते विभागली गेली त्याचा मताधिक्य मिळवण्यासाठी परिणाम झाला. त्यामध्ये सातारा सुद्धा निश्चितपणाने आहे, हे सर्व पाहता लोकांनी निवडणुकीला आदरणीय शरद पवारांच्या सातारा जिल्ह्याला पाठबळ दिले, याचा मला उल्लेख करावा लागेल. विशेषतः सर्वसामान्य लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही निवडणूक लढलो. ही निवडणूक लढत असताना मोठ्या प्रमाणात यंत्रणा, सगळी शक्ती सर्व मोठ्या प्रमाणात वापरले गेली तरी सुद्धा त्या मध्ये लोकांनी प्रामाणिकपणाने सहकार्य केलेल आहे. या सहकार्याच्या बाबतीत मी 5 लाख 38 हजार मते जनतेने दिलेली साथ मी विसरू शकत नाही, याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. 

    निवडणुकीत हार जीत होत असते जबाबदारी वाढली आहे, पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या बरोबरीने मला काम करावे लागेल. मी निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस काय परिणाम होण्याचा विचार नव्हता केला. पक्षाच्या आणि नेत्यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीला सामोरे गेलो. पराभव झाला तो मी स्वीकारला. निवडणुकीला पराभूत झालो तरी मी खचणार नाही. सगळ्यांना वाटेल शशिकांत शिंदे संपला परंतु शशिकांत शिंदे संपणार नाही. मी काही मिळवलं नव्हतं, लोकांचं प्रेम हे मिळू शकलो. मी एकटा लढत होतो, माझे सहकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते माझ्याबरोबर होते. जनता माझ्याबरोबर होती. समाजाने मला पाठबळ दिले, या पुढची जबाबदारी वाढली आहे की यापुढे असलेल्या सर्व निवडणुकांमध्ये ताकतीने कामाला लागू. 

    महाविकास आघाडीची मोट मी चांगल्या प्रकारे बांधील, मी पूर्णवेळ पक्षाच्या बांधणी करण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला प्राधान्य देण्याचा काम मी करेल. विधान परिषदेचा आमदार असल्यामुळे महाराष्ट्रात काम करण्याचा मला अधिकार आहे. त्या अधिकाराच्या माध्यमातून लोकांनी ज्या अपेक्षा निवडणुकीच्या काळात व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. स्थानिक भूमिपुत्रांना काम, नागरी सुविधांचा अभाव, पाणी प्रश्न अशा अनेक प्रश्नांची निवडणुकीत जी मागणी केली त्या मागणीची पूर्तता करण्यात काम नक्कीच करेल. हे प्रश्न निवडणुकीच्या दरम्यान लोकांनी माझ्यासमोर मांडले सोडवेल. निवडून जरी आलो नाही तरी आपला हक्काचा लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करेल. सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच निर्णय घेईल.

  • 01:45 PM • 06 Jun 2024
    Maharashtra Live News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल!

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 1 वाजता नागपुरात दाखल झाले आहेत. विमानतळावरून ते थेट शिवाजीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला पोहोचले. स्थानिक नागरिकांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवाजीनगरमधील शिवाजी उद्यानात कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

  • 01:39 PM • 06 Jun 2024
    Maharashtra Updates : पवईत पोलिसांवर दगडफेक, आंदोलक आक्रमक!

    मुंबई पवई परिसरातील भीम नगर परिसरात 'जय भीम नगर झोपडपट्टी वाचवा' आंदोलन चिघळलं आहे. आंदोलक आक्रमक भूमिकेत दिसले. निष्काशनाची कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत.

  • 10:47 AM • 06 Jun 2024
    Maharashtra Updates : "मला जाऊदे ना घरी वाजले की बारा", राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

    लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजी असून, देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर विधानसभेसाठी काम करायचं असून, मला सरकारमधून मुक्त करावं, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांच्या याच विधानावरून संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. 

    "मी पुन्हा येईन… पुन्हा येईन...
    लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन
    असे गळा फ़ोडून सांगणारे
    आता
    मला जाऊदे ना घरी 
    वाजले की बारा
    अशी रेकॉर्ड लावत आहेत.
    छान
    महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
    अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत
    जय महाराष्ट्र!"


     

  • 10:03 AM • 06 Jun 2024
    Maharashtra Live News : अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे परतण्याची चर्चा

    लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचाली झाल्या आहेत. निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जबरदस्त कामगिरी केली आहे. 

    शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या १० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी तब्बल ८ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १ जागाच जिंकली. महत्त्वाचे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. 

    या निकालाने शरद पवार यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे दिसून आले असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली आहे. अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

    या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोणते आमदार हजर राहणार आणि कोणते पाठ फिरवणार, याबद्दल उत्सुकता आहे. 

     

follow whatsapp