Nirmala Sitharaman Lok Sabha Elections 2024 : भाजपकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नकार दिला आहे. निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसेच नाहीत, असे कारण निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. (Nirmala Sitharaman Said, that 'I don't have money to contest elections')
ADVERTISEMENT
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपचा (BJP) लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे 'आवश्यक निधी' नाही. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
निर्मला सीतारामन निवडणूक न लढवण्याबद्दल काय बोलल्या?
एका कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन म्हणाल्या, "एक आठवडा किंवा दहा दिवस विचार केल्यानंतर, मी उत्तर दिले... कदाचित नाही. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी एवढा पैसा नाही, मग ते आंध्र प्रदेश असो किंवा तामिळनाडू. जिंकण्यासाठीच्या वेगवेगळ्या निकषांचेही प्रश्न आहेत... तुम्ही या समाजाचे आहात की त्या धर्माचे? तुम्ही या धर्माचे आहात का? मी म्हणाले नाही, मला वाटत नाही की मी ते करू शकेल."
सीतारामन यांच्याकडे पैसे का नाहीत?
त्या म्हणाल्या, "त्यांनी माझी विनंती मान्य केल्याबद्दल मी खूप आभारी आहे... म्हणूनच मी निवडणूक लढवत नाही." जेव्हा सीतारामन यांना विचारण्यात आले की, देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसे का नाही? त्यावर त्या म्हणाल्या की, भारताचा निधी हा त्यांचा वैयक्तिक निधी नाही. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत माझी आहे. भारताचा एकत्रित निधी नाही."
मी उमेदवारांचा प्रचार करेन- सीतारामन
19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने अनेक विद्यमान राज्यसभा सदस्यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये पियुष गोयल, भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर, मनसुख मांडविया आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश आहे.
हेही वाचा >> बारामतीसाठी अजित पवारांचा विजय शिवतारेंसोबत 'तह'
सीतारामन या कर्नाटकच्या राज्यसभा सदस्य आहेत. अन्य उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, "मी अनेक माध्यमांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होईल आणि उमेदवारांसोबत फिरेन. जसं की उद्या मी राजीव चंद्रशेखर यांच्या प्रचारासाठी जाणार आहे. मी प्रचारात असेन."
सीतारामन यांच्याकडे किती आहे संपत्ती?
देशाच्या तिजोरीचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या तुलनेत खूप कमी संपत्ती आहे. चार वर्षांपूर्वी (2020) त्यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला तेव्हा, मोदी मंत्रिमंडळातील सर्वात कमी मालमत्ता असलेल्या मंत्र्यांपैकी त्या एक असल्याचे उघड झाले.
हेही वाचा >> भाजपला 28 जागा, राष्ट्रवादीला 5; तर शिंदेंच्या शिवसेनेला...; काय ठरला फॉर्म्युला?
त्यावेळी सीतारामन यांच्याकडे सुमारे 1.34 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यांच्याकडे पतीसोबत संयुक्त शेअर म्हणून 99.36 लाख रुपयांचे घर आहे. याशिवाय त्यांच्याकडे सुमारे १६.02 लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे.
कार नाही, तर बजाज स्कूटर
अर्थमंत्र्यांकडे स्वत:च्या नावावर एकही गाडी नाही. त्यांच्याकडे बजाज चेतक ब्रँडची जुनी स्कूटर आहे, ज्याची किंमत त्यावेळी सुमारे 28,200 रुपये होती. त्यांची एकूण जंगम मालमत्ता 18.4 लाख रुपये इतकी आहे. दायित्वे म्हणून, त्याच्याकडे 19 वर्षांपर्यंतचे कर्ज, एक वर्षाचा ओव्हरड्राफ्ट आणि 10 वर्षांचे तारण कर्ज आहे.
ADVERTISEMENT