Uddhav Thackeray : 'त्या' विधानामुळे 'मविआ'त धस्स्स! ठाकरेंनी अखेर सोडलं मौन!

भागवत हिरेकर

06 May 2024 (अपडेटेड: 11 May 2024, 04:09 AM)

Uddhav Thackeray PM Modi : पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात संशय कल्लोळ निर्माण झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करावी लागली...

follow google news

Uddhav Thackeray on PM Modi Statement : नेत्यांच्या विधानांचे कधी काय अर्थ लावले जातील आणि त्यामुळे त्याचा पक्षातील कार्यकर्ते आणि मित्रपक्षांत पडसाद उमटतील, सांगता येत नाही. याचीच प्रचिती गेल्या दोन-तीन दिवसांत आली. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केले. त्यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्षाच्या मनातही धस्स्स झालं. दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त होण्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं आणि मविआत निर्माण झालेला संभ्रम दूर केला. मोदींच्या विधानामुळे नेमकं काय घडलं आणि ठाकरेंना खुलासा का करावा लागला, हेच जाणून घ्या... (I will not go with BJP, said Uddhav Thackeray while talking about Prime Minister Modi's statement)

हे वाचलं का?

"बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी त्यांचा (उद्धव ठाकरे) मानसन्मान करेनच... ते माझे शत्रू नाहीत. जर उद्या ते अडचणीत आले तर मी पहिला व्यक्ती असेन की, मी त्यांची मदत करेन", असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. 

मोदींच्या विधानाची जोरदार चर्चा!

ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदींनी केलेल्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जाणार नाही, हे कसं शक्य होतं. झालंही तसंच. मोदींच्या विधानाची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे परत भाजपसोबत जाऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यालाही हवा मिळाली. तिसऱ्या टप्प्यातील मतदान तोंडावर असताना अचानक असं सगळं सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. पण, त्यावर अखेर ठाकरेंनी पडदा टाकला. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

अलिबागमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेत त्यांनी मोदींनी केलेल्या विधानावर भूमिका स्पष्ट केली. "महाराष्ट्राने त्यांना ४१ खासदार दिले. एवढे करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. आणि आता अफवा पसरवताहेत... मध्येच त्यांना काय प्रेम आले, देव जाणो. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं... अरे आणून बघा... माझं हे (सभेतला उपस्थित लोकांकडे हात करत) सुरक्षा कवच माझ्यासोबत आहे. मोदीजी, तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही."

"मला माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभवती जगभर आणि महाराष्ट्रभर आहे. तुम्ही संकट म्हणून माझ्यावर आलेला आहात. धाराशिवच्या सभेत मी बोललो. मोदीजी, जे म्हणाले की, ऑपरेशनचा सल्ला मला त्यांनी दिला होता. मग ते माझी चौकशी करत होते. या खऱ्या खोट्या मध्ये मी जात नाही. जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय, हे लोकांना कळलं आहे.."

हेही वाचा >> 'तेव्हा उद्धव ठाकरेंना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन..', मोदींच मोठं विधान

"फक्त माझ्याशी खोटं बोलले असं नाहीये. तुम्हाला जी जी वचने दिली होती, मग १५ लाख, दोन कोटी रोजगार, घराचं वचन दिले असेल, आणखी काही असेल... सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी-शाह आणि भाजपने केलं आहे. मोदींची गॅरंटी मला नकोय. माझी गॅरंटी माझ्यासमोर आहे."

"त्यांनी जे सांगितलं की, ते माझी चौकशी करत होते. मग मोदी साहेब, तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात, तर मग तुमचे इथले जे पाव उपमुख्यमंत्री आहेत. त्या तुमच्या चेल्याचपाट्यांना माहिती नव्हतं का, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. मी रुग्णालयात असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दाराशी हुडी घालून बोलणी कोण करत होतं?"

हेही वाचा >> वर्षा गायकवाडांचं टेन्शन झालं कमी, 'या' नेत्यांची मिळणार साथ!

"हे तुम्हाला माहिती नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली खेचातायत. गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताहेत, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम? एक तर तुम्हाला हिंदू ह्रदयसम्राट शब्द उच्चारायला जड जातोय. बाळासाहेबाचं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. हे कर्ज आता महाराष्ट्रातील जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही."

"एक संभ्रम पसरवून जात आहेत की, उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला. उद्धव ठाकरेंसाठी खिडक्या उघडल्या. आणखी काय काय उघडतील, पण महाराष्ट्र जो लुटतोय, त्याच्यासोबत हा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय?", असे म्हणत ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याबद्दल जी चर्चा सुरू झाली. त्याला पूर्णविराम दिला. 

ठाकरेंना का करावा लागला खुलासा?

भाजपसोबत सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण, या दोन्ही मित्रपक्षांचा फारसा फायदा भाजपला होण्याची शक्यता कमी असल्याचे अंदाज आहेत. 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची सुप्त लाट महाराष्ट्रात दिसत आहे. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे अंदाज आहेत. निकालानंतर उद्धव ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा >> फलंदाजाने शॉट मारताच, गोलंदाजाने सोडला जागेवरच जीव! पुण्यातील घटनेचा व्हायरल Video 

त्यात मोदींनी असे विधान केले. त्यामुळे ठाकरेंबद्दल संभ्रमाचे वातावरण राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले. याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू झाली होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मदत घेतील आणि निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, अशा प्रतिक्रिया मोदींच्या विधानानंतर उमटल्या. त्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचे लक्षात येताच ठाकरेंना यावर भूमिका स्पष्ट करावी लागली. 

    follow whatsapp