Mahayuti Lok Sabha Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी बैठक झाली. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकीत जागावाटपाबरोबर इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेता एकनाथ शिंदे यांनी एका मुद्द्यांकडे अमित शाह यांचं लक्ष वेधलं.
ADVERTISEMENT
महायुतीच्या जागावाटपाबद्दल अजूनही ठरलं नाही. मुंबईत चर्चा झाल्यानंतर दिल्लीत अमित शाह यांच्या घरी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
राष्ट्रवादी-शिवसेना किती जागा?
या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 30 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर शिवसेनेला 10 ते 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 6 ते 8 जागा देण्याबद्दल चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 11 मार्च रोजी बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीलाही अमित शाह, जेपी नड्डा, मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल पटेल उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा >> अजित पवार रोहित पवारांमधील संघर्ष टोकाला, जुन्या जखमेवर ठेवलं बोट
मतांबद्दल काय झालं बोलणं?
या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलं की, जिंकून येणं हाच उमेदवारीचा निकष असेल. त्याचबरोबर एकमेकांची मते मित्रपक्षांना मिळतील, यासाठी व्यवस्थित जागावाटप व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितलं.
मतदारसंघांची अदलाबदल
या बैठकीत मतदारसंघांची अदलाबदल करण्यावरही चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मते एकमेकांना ट्रान्सफर होण्याचा मुद्दा मांडला.
शिंदे म्हणाले की, "शिवसेनेविरोधात (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचे उमेदवारांची स्थिती चांगली आहे. मुंबई आणि कोकणात ज्या जागांवर ठाकरेंचे उमेदवार आहेत, तिथे शिवसेनेचे उमेदवार देणे चांगेल ठरेल, नाहीतर शिवसेनेची मते भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे ट्रान्स्फर होणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या जागा शिवसेनेला लढू द्या", असे शिंदे यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा >> मराठा उमेदवारांमुळे महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर मतदान?
यावर अमित शाह यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलं की, आपापली मते मित्रपक्षांकडे ट्रान्स्फर होतील, याबद्दल खबरदारी घ्यावी. दरम्यान, परभणी, बुलढाणा या शिवसेनेच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. अमरावती मतदारसंघावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा केला.
ADVERTISEMENT