कोरोना महामारीची झळ बसलेल्या अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’

मुंबई तक

• 02:10 PM • 28 Jul 2021

करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या […]

Mumbaitak
follow google news

करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या आंदोलनाची दिशा कशी असेल? रंगकर्मीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? यासाठी नुकत्याच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते विजय पाटकर, विजय गोखले, दिग्दर्शक विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, सुभाष जाधव, प्रमोद मोहिते आदि मान्यवर मंडळी तसेच संघटक व सहसंघटक यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. यावेळी रंगकर्मींच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाली. व त्यांच्या मागण्यांचा आढावा घेण्यात आला.

हे वाचलं का?

रंगकर्मींचे झालेले हाल लक्षात घेऊन आमच्या या मागण्यांची शासनाने अवश्य दखल घ्यावी व आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असे प्रतिपादन उपस्थित सर्वांनी यावेळी केले. सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इ.लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांचाही या आंदोलनात समावेश असणार आहे.

या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.

करोना काळातील मागण्या

१.एकपात्री किंवा दोन-तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात, मोकळ्या जागेत, पटांगणात सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी.

२. फी न भरल्यामुळे रंगकर्मीच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. तात्काळ संबंधित शिक्षण संस्थांशी बोलून हा प्रश्र्न निकाली काढावा.

३. गेल्या दीड वर्षात काम नसल्याने कमाई झालेली नाही. त्यामुळे घरभाडे आणि इलेक्ट्रीसिटी बिल भरण्यास अडचण होत आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या संबंधित आस्थापनांना आपण आदेश देऊन रंगकर्मींना सवलत मिळवून द्यावी ही विनंती.

४. अटी नियमांचे पालन करून आम्हां रंगकर्मींना आमची कला सादर करण्याची परवानगी द्यावी.

५. काही प्रमाणात चित्रीकरण सुरु झाले आहे परंतु लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि खर्च तसेच वेळेचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे, त्यामुळे शुटिंग चालू असलेल्या कलाकार-तंत्रज्ञांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी.

६. महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी ‘रंगकर्मी रोजगार हमी योजना’ लागू करावी.

७. कोरोना काळातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना दरमहा रुपये ५,०००/- इतका उदरनिर्वाह भत्ता मिळावा.

कायमस्वरूपी मागण्या

१. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी.

२. कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटीं मध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या आकड्यात वाढ करावी.

३. रंगकर्मी हा असंघटित आहे. माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर ‘रंगकर्मी बोर्डा’ ची स्थापना करावी.

४. मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या रंगकर्मींना भाडे तत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मींना विश्रांतीगृहांमध्ये राहण्याची सोय असावी.

५. शासनातर्फे रंगकर्मीं साठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडको च्या घरांसाठीच्या संख्येत ५% वाढ करावी.

६. निराधार, वयोवृद्ध रंगकर्मींची शासकीय आणि खासगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी. सोबत त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.

७. महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका / जिल्हा परिषद हॉस्पिटल्स मध्ये रंगकर्मींसाठी राखीव बेड असावेत.

    follow whatsapp