Maharashtra Live : भाजप आमदार टी. राजा यांना अटक

मुंबई तक

16 Jun 2024 (अपडेटेड: 16 Jun 2024, 03:21 PM)

Maharashtra news Live update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकजूट असल्याचे दाखवले जात असताना महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर येताना दिसत आहे... वाचा लाईव्ह अपडेट्स 

भाजप आमदार टी राजा सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

भाजपचे आमदार टी. राजा सिंह

follow google news

Maharashtra Live News : महाराष्ट्रात एकीकडे पेरण्या सुरू असून दुसरीकडे राजकीय पक्षही 'मत'पेरणीला लागले आहेत. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र आणि जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील मतदारांचा कल समोर आला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती नव्याने रणनीतीच्या कामाला लागल्याची माहिती आहे. दुसरीकडे अनुकूल वातावरण असल्याने महाविकास आघाडीत लवकर जागावाटप भर दिला जात आहे. 

राजकीय घडामोडींबरोबरच महाराष्ट्रात इतरही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आहेत. या सगळ्यांसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:26 PM • 16 Jun 2024
    EVM हॅक करणं शक्यच नाही, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

    ईव्हीएम मतमोजणीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. ओटीपीमुळे ईव्हीएम हॅक होत नाही, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. ईव्हीएम हॅक करणं शक्यच नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटंल

  • 04:54 PM • 16 Jun 2024
    Maharashtra News : वायबसे कुटुंबीयांची भेट घेताना पंकजा मुंडे ढसाढसा रडल्या

    बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आत्महत्या केल्या. बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी येथील युवक पोपट वायबसे यांनी आत्महत्या केली होती आज पंकजा मुंडे यांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करत असताना पंकजा मुंडे यांना सुद्धा अश्रू रोखता आले नाहीत..

    पंकजा मुंडे घरी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला त्यानंतर पंकजा मुंडे यांना सुद्धा अश्रू अनावर झाले.
     

  • 04:46 PM • 16 Jun 2024
    Maharashtra News : रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लिल पोस्ट करणारा पोलिसांच्या ताब्यात

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

     

  • 03:11 PM • 16 Jun 2024
    T.Raja Singh : भाजप आमदार टी.राजा यांना अटक

    भडक विधानांमुळे सातत चर्चेत राहणारे भाजपचे आमदार टी.राजा सिंह यांना अटक झाली आहे. तेलंगणा पोलिसांनी टी. राजा सिंह यांना अटक केली आहे. 

    तेलंगणातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुंडाकडून हल्ला करण्यात आला होता. त्यांना भेटायला जात असताना तेलंगणा पोलिसांनी अटक केली, असे टी. राजा यांनी म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे याकडे लक्ष वेधले आहे. 

     

  • 03:05 PM • 16 Jun 2024
    Ravindra Waikar : "वायकर साहेब, विजयी झालात असं वाटतं का?"

    मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल वादात सापडला आहे. ईव्हीएमचा ओटीपी ज्या सरकार मोबाईलवर येतो, तो मोबाईलच वायकर यांच्या मेहुण्याकडे होता. त्यावरून आता हे प्रकरण गाजत असून, यावर आता सुषमा अंधारे यांनी सवाल केला आहे. 

    "वायकर साहेब, नीतिमत्ता नावाची गोष्ट भाजपकडे शिल्लक नाहीच. पण, आपल्यातला सद्सद्विवेक जागा असेल अशी माझी धारणा आहे. हे सगळं वाचून, बघून खरंच अजूनही आपल्याला आपण विजयी झालात असं वाटतं का?", असा सवाल सुषमा अंधारे यांनी रवींद्र वायकर यांना केला आहे.

    संबंधित बातमी >> ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वायकरांच्या नातेवाईकाकडून वापर

    सुषमा अंधारे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबद्दल केलेले ट्विट.
  • 02:09 PM • 16 Jun 2024
    Beed News : जयदत्त क्षीरसागर यांचा कार्यकर्ता मेळावा

    बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. मेळाव्याला मोठी गर्दी झाली. या मेळाव्याला पुतणे संदीप क्षीरसागर यांचं कुटुंब उपस्थित आहे. वडील रवींद्र क्षीरसागर आणि भाऊ हेमंत यांची उपस्थिती आहे. पाच वर्षांपूर्वी दुरावलेले क्षीरसागर कुटुंब पहिल्यांदाच एकत्र आलं आहे. जयदत्त क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर सख्खे भावंडं पुन्हा एकत्र आलेत.

     

  • 02:04 PM • 16 Jun 2024
    Maharashtra News : शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर बैठक

    आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर पक्षाची बैठक होणार आहे. नेते, आमदार, खासदार, सचिव, प्रवक्ते, जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत 19 जूनच्या वर्धापन दिनाचे नियोजन करण्याबाबत चर्चा होणार आहे. आज संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत परत ठाणे टीप टॉप प्लाझा येथे निरंजन डावखरेसाठी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील.

     

  • 01:48 PM • 16 Jun 2024
    Ravindra Waikar Amol Kirtikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा 'निकाल' वादात

    मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून वाद निर्माण झाला आहे. रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी झाले होते. मतमोजणीवर अमोल कीर्तिकर यांनी शंका उपस्थित केल्या. त्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 

    नेमकं काय झालंय... पहा VIDEO

     

  • 01:41 PM • 16 Jun 2024
    Sanjay Raut Update : भाजप 'हे' तीन पक्ष फोडेल -संजय राऊत

    लोकसभा अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 

    माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे भाजपचे पॉलिटिकल एजंट होते. त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचे जाहीर करण्यात आले."

    "सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचा व्हीप आणि राज्यपालांची संपूर्ण कार्य बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तरीही नार्वेकरांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने बनावट निकाल दिला. तसेच उद्या लोकसभेत भाजपचा अध्यक्ष असेल, तर दिला जाऊ शकतो", असा खळबळजनक दावा राऊतांनी केला.

    "ज्याचे खावे मीठ, त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष झाल्यावर सरकार ज्यांच्या टेकूवर उभे आहे, त्या चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान आणि नितीश कुमार यांचे पक्ष ते फोडतील", असे राऊत म्हणाले.

  • 11:50 AM • 16 Jun 2024
    Maharashtra News updates : "उद्या आम्ही आमची सत्ता आणू", ओबीसी आरक्षण मुद्दा तापला

    जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी जाऊन शेंडगे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.

    "महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसींवरती जो हल्लाबोल झाला आहे, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आहे", अशी भूमिका ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी मांडली. 

    "जर जरांगे उपोषण करू शकतात, तर हम भी कुछ कम नही. प्रत्येक जिल्ह्यात उपोषण सुरू होईल. ओबीसी समाजावर जो हल्ला होत आहे, तो हल्ला सरकारने ताबडतोब थांबवावा. तसेच सगेसोयरे कायद्याची अधिसूचना मागे घ्यावी नसता, उपोषणाचा वनवा अवघ्या महाराष्ट्रात पेटेल", असा इशारा शेंडगे यांनी दिला.

    "ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागला नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असेल, तर सरकारने ओबीसी समाजाची माफी मागावी", अशी मागणी शेंडगे यांनी केली.

    "उद्या आम्ही आमची सत्ता आणू आणि एक-एक जीआर रद्द करून ओबीसींचं आरक्षण पुन्हा स्थापित करू", असे विधान शेंडगे यांनी केले आहे.

  • 11:34 AM • 16 Jun 2024
    BJP MLA : भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांना राष्ट्रवादीकडून ऑफर

    चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप यांच्या राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. 

    शंकर जगताप हे भाजपचे शहराध्यक्षही आहेत. शंकर जगताप यांनी विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून, दुसरीकडे अश्विनी जगताप यांनीही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. 

    भाजपमध्ये सुरू झालेल्या या संघर्षानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दोघांनाही पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. दोघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला हवे, असे कामठे यांनी म्हटले आहे. 

  • 09:34 AM • 16 Jun 2024
    Maharashtra News Live : वक्त आने दो जबाब भी देंगे और...

    लोकसभा निवडणुकीनंतर कोकणात महायुतीत शीतयुद्ध सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. 

    खासदार नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचा विजय झाला असला तरी शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष उफाळून येताना दिसत आहे. 

    नारायण राणेंचे अभिनंदन करणारे बॅनर शिवाजी चौकात लावण्यात आला होता. यावर किरण सामंत आणि जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा फोटो अज्ञातांनी फाडला. 

    या घटनेनंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो असलेला बॅनर लावण्यात आला. त्यावर 'वक्त आने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे' असा इशारा देण्यात आला. 

    यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटली आहे. नीतेश राणे कार्यकर्त्यांसह विजयाचा गुलाल उधळतानाचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला. त्यावर हमारा वक्त आया है... तुम्हारा वक्त आने भी नहीं देंगे" असं लिहिलेलं आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना संघर्ष पुन्हा वाढताना दिसत आहे. 

    दुसरीकडे, नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी आपण कोकणातून शिवसेना संपवली असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वी नीलेश राणे यांनी रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. 

    त्यातच आता नारायण राणेंनीही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील सर्व जागांवर भाजपचा आमदार असेल, त्यादृष्टीने आपण काम करणार आहोत. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे विधान केले आहे. 

    आणखी वाचा >> 'कोकणातून मी शिवसेना संपवली..' नेमकं कोणाला डिवचलं?

follow whatsapp