Maharashtra News Updates : महायुती आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. दोन्ही आघाड्यांतील राजकीय पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चांवर भर दिला जात असून, जागावाटप करताना बंडखोरी रोखण्याचेही आव्हानही या आघाड्यांसमोर असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणूक निकालात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळावल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महायुतीतील पक्षांकडून नेते, पदाधिकाऱ्यांना बळ दिले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात पडद्यामागे राजकीय घडामोडी घडत असून, त्यासंदर्भातील लाईव्ह अपेडट्स वाचा...
त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घटनांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी लाईव्ह ब्लॉग वाचत रहा
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 08:50 AM • 18 Jun 2024Maharashtra News : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शेकडो समर्थक वडीगोद्रित
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी जालन्यातल्या वडीगोद्रित ओबीसी समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे मागील 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेत. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना भेटण्यासाठी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने ओबीसी समाज वडीगोद्रित दाखल होतोय. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातून शेकडो गाड्यांचा ताफा जालन्यातल्या वडीगोद्रित दाखल झाला असून एक प्रकारे शक्तिप्रदर्शन या माध्यमातून ओबीसी समाज करतांना दिसतोय.
- 07:43 PM • 17 Jun 2024राहुल गांधी रायबरेलीतून खासदार राहणार, वायनाडची जागा सोडली
राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आणि वायनाडमधून राजीनामा देणार आहेत. वायनाडमधून राहुल गांधी यांच्या जागेवर प्रियांका गांधी लढणार आहेत. प्रियांका गांधी वायनाडची पोटनिवडणूक लढणार आहेत. प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
- 02:44 PM • 17 Jun 2024मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या निकालात गडबड-आदित्य ठाकरे
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची सीट हातातून गेली कशी, त्यात काय गडबड झाली, हे सांगण्यासाठी आम्ही आलो असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच ही लढाई आम्ही कोर्टात लढणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
- 02:19 PM • 17 Jun 2024विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या प्रभारीपदी 'या' नेत्याची निवड
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राच्या प्रभारीपदी आणि अश्विनी यादव यांची सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर राज्यांचे प्रभारी देखील बदलण्यात आले आहे.
- 01:23 PM • 17 Jun 2024EVM News Marathi : "...तर राहुल गांधी दोन्ही जागांवर जिंकले नसते"
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे खासदार झाले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार असलेल्या कीर्तिकरांनी मतमोजणीवरच आक्षेप घेतला आहे.
हे प्रकरण आता देशभरात गाजत असून, ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. वायकरांच्या विजयाबद्दल शंका उपस्थित होत आहेत. त्याला आता शिंदेंच्या शिवसेनेने उत्तर दिले आहे.
शिवसेनेचे नेते संजय निरुपम विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले, "2024 मध्ये जी निवडणूक झाली, त्यात ईव्हीएम हॅक झालेले नाहीत. जर ईव्हीएम हॅक झाले असते, तर राहुल गांधी दोन जागांवर निवडणूक जिंकले नसते."
निरुपम पुढे म्हणाले, "जर ईव्हीएम हॅक करता आले असते, तर भाजप फक्त २४० जागांवर थांबली नसती. जर ईव्हीएम हॅक झाले असते, तर काँग्रेसला 99 जागाही मिळाल्या नसत्या. त्यामुळे नक्कीच ईव्हीएम हॅक झालेले नाही. निवडणूक जिंकल्यानंतर जे लोक हे बोलत आहेत, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा", असे प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी विरोधकांना दिले आहे.
- 12:12 PM • 17 Jun 2024Live News : एक्स्प्रेसला मालगाडीची जबर धडक, पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात!
पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात घडला आहे. रूळावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर एक्स्प्रेसच्या मागील 3 बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
- 11:15 AM • 17 Jun 2024Sanjay Raut : शिंदे काय एलॉन मस्कचा बाप आहे का?- संजय राऊत
'मुंबई उत्तर-पश्चिममधील निकाल हा एक आदर्श घोटाळा आहे. निकाल घोटाळ्यातील आदर्श घोटाळ्याचं उदाहरण मुंबईत आहे. उत्तर-पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे. CCTV फुटेज का दिलं जात नाही?, त्यांना कोणाचे फोन या काळात आले? हे तपासलं पाहिजे. वंदना सूर्यवंशीचा फोनसुद्धा ताब्यात घेतला पाहिजे. सगळा त्यांचा स्टाफ, त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे आतमध्ये फिरत होते, अधिकाऱ्यांचे फोन जे आतमध्ये घेऊन जे काही उद्योग चालले होते... तो फोन वनराई पोलिसांनी जप्त केल्यावर, वायकरांचा एक जवळचा माणूस निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्याने चार दिवस वनराई पोलीस ठाण्यात का येरझरा घालत होता?... अमोल कीर्तिकरांना 2 वेळाविजयी घोषित करण्यात आलं होतं...' असं संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलले. तसंच, मुख्यमंत्री शिंदे म्हणत आहेत की, विरोधकांची ही रणनीती आहे.. ईव्हीएमच्या बाबतीत असं होऊ शकत नाही असा सवाल राऊतांना विचारला असता ते म्हणाले, 'शिंदे काय एलॉन मस्कचा बाप आहे का?', अशा शब्दात त्यांनी टीका केली.
- 09:57 AM • 17 Jun 2024Jalna News : सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या भेटीला...
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी जालन्यातल्या वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून आज पाचव्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचा समावेश असणार आहे. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी (काल) उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून पाणी त्याग केलाय. सरकार वंचित घटकांची दखल घेत नाही असा आरोप काल हाके यांनी केला होता. त्यानंतर आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन्ही उपोषणकर्त्यांची सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. दरम्यान लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण आज सुटतं का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
- 09:46 AM • 17 Jun 2024Sharad Pawar : मुख्यमंत्री शिंदेंना शरद पवारांचे पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहिले आहे.
"पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली", अशी माहिती पवारांकडून देण्यात आली आहे.
- 09:41 AM • 17 Jun 2024Mumbai North West Lok Sabha : "वायकर यांचा खास माणूस...", राऊतांचे दोन सवाल
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल वादात सापडला आहे. मतमोजणी केंद्रावरील मोबाईल वापरल्याच्या प्रकरणात पोलिसांनी खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि एका निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर आता खासदार संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
"वनराई पोलीस स्टेशनचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) सेवानिवृत्त पीआय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनात चार दिवसांपासून काय डील करत होते?", असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत."वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे. रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वादग्रस्त फ़ोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे ऐकले. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात", असे सांगत राऊतांनी तपास प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत.
- 09:28 AM • 17 Jun 2024Chhagan Bhujbal News : भुजबळांनी बोलावली समता परिषदेची बैठक
राज्यसभा, लोकसभा आणि पुन्हा राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळाल्याने छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहे. त्यातच आता भुजबळांनी समता परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे.
मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या एमईटी संस्थेच्या संकुलात 17 जून सकाळी 11 वाजता समता परिषदेची बैठक होणार आहे. समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून भुजबळ मोठा निर्णयही घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा तापू लागला आहे. त्याला भुजबळांचा विरोध आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णयही भुजबळांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT