देशाने २१ ऑक्टोबर रोजी १०० कोटी लसीचे डोस देण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला. नऊ महिन्यांच्या कालावधीत देशानं हे लक्ष्य गाठलं असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी १०० कोटी डोसचं लक्ष्य गाठण्याचं प्रत्येक भारतीयाचं असल्याचं सांगत अभिनंदन केलं. यावेळी दिवाळी साजरी करतानाही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं.
ADVERTISEMENT
काय म्हणाले मोदी? दहा महत्त्वाचे मुद्दे…
1) ‘भारताने एकीकडे कर्तव्याचं पालन केल, तर दुसरीकडे देशाला मोठं यश मिळालं. भारताने काल १०० कोटी डोसचं कठीण उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. या यशात १३० कोटी लोकांचं योगदान आहे. त्यामुळे हे यश भारताचं आणि प्रत्येक भारतीयाचं आहे. देशवासीयांचं अभिनंदन करतो. १०० कोटी डोस ही केवळ संख्या नाही, तर देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब आहे. इतिहासाच्या नव्या अध्यायाची पायाभरणी आहे.’
2) ‘अवघड उद्दिष्ट समोर ठेवून ते साध्य करणं माहित असलेल्या भारताचं हे चित्र आहे. संकल्प पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या भारताचं हे चित्र आहे. आज अनेक लोक भारताच्या लसीकरणाची तुलना जगातील इतर देशांशी करत आहे. भारताने ज्या वेगाने १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला, त्याबद्दल कौतुक होतंय. पण, सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आपण सुरुवात कोठून केली. जगातील मोठे देश लस संशोधन आणि निर्मितीत पुढारलेले आहेत. भारत या देशांनी बनवलेल्या लसींवरच अवलंबून असायचा. भारत बाहेरून लस मागवायचा, त्यामुळे जेव्हा कोरोना आला तेव्हा भारताबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले.’
3) ‘भारत या महामारीचा सामना करु शकेल का? भारत लसी खरेदी करण्यासाठी इतका पैसा कोठून आणणार? भारताला लस कधी मिळेल? भारतीयांना लस मिळेल का? कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत इतक्या लोकसंख्येचं लसीकरण करु शकेल का? अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले गेले. पण, आज १०० कोटी डोस हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे.’
4) ‘भारताने शंभर कोटी लसी दिल्या आहेत आणि त्याही मोफत. कोणतेही पैसे न घेता. १०० कोटी डोसचा प्रभाव असाही दिसेल की, जग भारताला कोरोनापासून अधिक सुरक्षित मानेल. एक फार्मा हब म्हणून भारताला जगात मान्यता मिळाली आहे. ती अधिक मजबूत होणार आहे. संपूर्ण विश्व भारताच्या ताकदीला बघत आहे. देशाने मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेतली. गरीब-श्रीमंत, गाव-शहरं सगळीकडे लसीकरण केलं गेलं. जर आजार भेदभाव करत नाही, तर लसीकरणातही भेदभाव होऊ शकत नाही. त्यामुळे लसीकरण अभियानात व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली.’
5) ‘लोक लस घेण्यासाठी येणार नाहीत, असंही बोललं गेलं. भारतीयांनी १०० कोटी लसीचे डोस घेऊन शंका उपस्थित करणाऱ्यांना निरुत्तर केलं आहे. जनतेच्या सहभागाला ताकद बनवली. टाळ्या-थाळ्या वाजवण्यातून देशाची शक्ती दिसून आली. लसीकरण मोहिमेसाठी तंत्रज्ञान वापरलं आहे. लसीकरण अभियान विज्ञानाच्या कुशीत जन्मलं आहे. भारताचं संपूर्ण लसीकरण मोहीम विज्ञानाधारित आहे. अवाढव्य देशातील वेगवेगळ्या राज्यात वेळेत लसींचा पुरवठा करणं हे भगीरथाप्रमाणेच काम होतं. पण, संसाधन वाढवली गेली. कोविन प्लॅटफॉर्मची जगभरात चर्चा आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचं काम सोप्प केलं.’
6) ‘आज सगळीकडे विश्वास आणि उत्साहाचं वातावरण आहे. समाजजीवनापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत आशावादी वातावरण आहे. तज्ज्ञ आणि देश-विदेशातील पत मानाकंन संस्था भारताबद्दल सकारात्मक आहे. भारतीय कंपन्यांमध्ये उच्चांकी गुंतवणूक येत असून, रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. मागील काही महिन्यात केल्या गेलेल्या सुधारणांचा भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्यात मोठी भूमिका बजावणार आहेत.’
7) ‘कोरोना काळात कृषी क्षेत्राने देशाची अर्थव्यवस्था सावरली. आज विक्रमी अन्नधान्याची खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जात आहेत. आर्थिक सामाजिक परिस्थिती आता गती येत आहेत. आगामी सण उत्सवाचा काळ याला आणखी गती देईल. आता देशात उत्सवाचं वातावरण आहे. मी देशवासीयांना आवाहन करतो की, भारतीयांनी मेड इन इंडिया वस्तू घेण्यालाचा प्राधान्य द्यावं. भारतात आणि भारतीयांनी बनवलेली वस्तू खरेदी करणं हे आपल्या व्यवहाराचा भाग बनवावं लागेल.’
8) ‘तुम्हाला मागील दिवाळी आठवत असेल, सगळीकडे तणावाचं वातावरण होतं. पण, यावेळीच्या दिवाळीत १०० कोटी डोसमुळे विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातील लस सुरक्षा देऊ शकते, तर देशात तयार होणाऱ्या वस्तू दिवाळी अधिक भव्य बनवू शकतात. दिवाळीच्या वेळी होणारी खरेदी एकीकडे आणि वर्षभरातील दुसरीकडे असते.’
9) ‘आज आपण म्हणून शकतो की, मोठी उद्धिष्ट समोर ठेवून ते साध्य करणं देशाला माहिती आहे. पण त्यासाठी आपल्याला सतत सावध राहावं लागणार आहे. आपल्याल निष्काळजी होऊन चालणार नाही. कवच कितीही चांगल्या दर्जाचं असलं, कवचामुळे सुरक्षेची पूर्ण हमी असली, तरीही जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली टाकले जात नाही.’
10)’सण उत्सव पूर्ण काळजी घेऊन साजरे करावेत, असा माझा आग्रह आहे. आता प्रश्न मास्कचा आहे. पण आता डिझाईनचे मास्कही मिळू लागले आहेत. माझं इतकंच म्हणणं आहे की, जशी आपल्याला पायात चप्पल-बूट घालून बाहेर जाण्याची सवय लागलीये, तसंच मास्कही सवयीचा भाग बनवून घ्यावा लागले.’
ADVERTISEMENT