मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (12 एप्रिल) ठाण्यात ‘उत्तरसभा’ होणार आहे. यावेळी राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मशिदीच्या भोंग्याना विरोध केला होता. ज्यावरुन राज्यभरात बराच वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आजच्या सभेच्या निमित्ताने आपण एक नजर टाकूयात राज ठाकरे यांच्या आजवरच्या वादग्रस्त वक्तव्यांविषयी
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांचे आजवरचे 12 वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून त्यांनी सत्ताधारी पक्षांवर बऱ्याच घणाघाती टीका केल्या आहेत किंवा काही कडवट भूमिका घेतल्या आहे. हे सगळं घडत असताना राज ठाकरे यांनी काही जाहीर सभेत अशी वक्तव्य केली होती ज्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. पाहा कोणती होती अशी वक्तव्यं की ज्यामुळे राज ठाकरे वादात सापडले होते:
-
मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची.
-
माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून मी अंगावर जाईन.. आणि जर माझ्या धर्माला कोणी जर नख लावण्याचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून मी अंगावर जाईन.
-
तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत. यांचं काहीच जात नाही. घरात घुसून मारतील..
-
मराठी माणूस पेटला या महाराष्ट्रात दंगली घडतील एवढं यांनी लक्षात ठेवावं. पण इथे येऊन आम्हाला आव्हान देणार असतील. तर अशाप्रकारच्या गोष्टी घडायला वेळ लागणार नाही. यांना वेळीच आवार घाला.. XXX
-
बाजूच्या सोसायटीमधील मुलाला आपल्या सोसयटीत खेळून देत नाहीत. मग तो काय भारतीय नाही का?.. जर स्वत:च्या सोसायटी कंपाऊडमध्ये बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊडमध्ये इतरांना का खेळू देऊ?
-
आजच सांगतो महाराष्ट्रात यापुढे फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल. दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाही. या विधानावर मला किती वेळा राज्य सरकारने अटक करावी. मी त्यासाठी तयार आहे.
-
ओवेसी बंधू आणि बाकी सगळ्यांना सांगून ठेवतोय. वेडवाकडं या महाराष्ट्रात काही घडवण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेशी गाठ आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढेल.
-
तो काय म्हणतो तर आझमगडवरुन 20 हजार माणसं घेऊन येईन म्हणे. अरे घेऊन तर ये.. जाताना फक्त 40 हजार पाय जातील.
-
कधी बोललो मी की, सगळ्या उत्तरप्रदेश-बिहारच्या लोकांना चालते करा म्हणून.. अजून नाही बोललो.. पण त्यांची दादागिरी महाराष्ट्रात वाढत गेली तर तेही करावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं.
-
यांनी फायनान्स केलेली ती दोन कार्टी जन्मला आलेलीच आहे ती ओवेसी XXX काय तर म्हणे.. गळ्यावरुन सुरी फिरवली तरी भारतमाता की जय म्हणणार नाही.. ये महाराष्ट्रात फिरवतो.
-
एक गोष्ट सांगून ठेवतो… मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल.. पण आपल्या कोणत्याही गोष्टींवर कोणी शिव्या घातल्या घराबाहेर काढून मारायचे..
-
मला विचारतात परप्रांतीयांना तुम्ही का मारता? मी त्यांना सांगितलं की, माझ्या महाराष्ट्रातील मराठी मुलांच्या तोंडचा घास जर ते पळवणार असतील तर परत मारीन..
राज ठाकरे बनले ‘हिंदुओका राजा’, उत्तरसभेआधी ‘या’ बॅनरची तुफान चर्चा
यासारख्या अनेक वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात वेळोवेळी राजकीय वाद निर्माण झाले आहेत. पण असं असलं तरीही राज ठाकरे हे कायमच वेगळ्या भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे आजच्या सभेत ते कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
ADVERTISEMENT