Banke Bihari Temple Stampede : मथुरेतल्या बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला आहे. ५० हून अधिक भाविकांची शुद्ध हरपली. मथुरेतल्या बांके बिहारी मंदिरात मंगला आरती सुरू असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमीही झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT
मंगला आरतीच्या वेळी चेंगराचेंगरी
वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होत असतात. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये यंदाही श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला गेला. बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीमुळे लाखोंची गर्दी होती. बांके बिहारी मंदिरात पहाटे चार वाजता मंगला आरती केली जाते. जन्माष्टमीवेळी मंगला आरती सुरु असताना चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत.
वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी
वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात देश-विदेशातील भाविकांची गर्दी नेहमीच असते, मात्र जन्माष्टमीवेळी ही गर्दी वाढते. जन्माष्टमीच्या दिवशी मथुरेमधील ८४ किलोमीटर परिसरात असलेल्या सगळ्याच मंदिरांमध्ये कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी असते. यंदा दोन वर्षांनी उत्साहात जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण साजरा होतो आहे. अशात जन्माष्टमी साजरी करण्यासाठी ५० लाखांपेक्षा जास्त भाविक मथुरेत पोहचले. मथुरेतल्या बांके बिहारी मंदिरात मंगला आरती सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर ५० भाविक बेशुद्ध झाले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या भाविकांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
बांके बिहारी मंदिरात नेमकी काय घडली घटना?
बांके बिहारी मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी व्हीआयपी लोकांना दर्शनासाठी विशेष सुविधा देण्यात आली होती आहे. एका भाविकाने सांगितलं की, वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत:च्या आईला घेऊन आले होते. तर मथुरा रिफायनरीचे एक मोठे पोलिस अधिकारी त्याच्या सात नातेवाईकांसोबत आरतीसाठी पोहोचले होते. हे सर्वजण बाल्कनीतून दर्शन घेत होते आणि त्यांच्या सुरक्षेसाठी छतावर जाणारे गेट बंद करण्यात आले होते. त्याचवेळी ही चेंगराचेंगरी झाली.
ADVERTISEMENT