रत्नागिरी शहरामध्ये एका रात्रीत २१ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विषप्रयोग करून या कुत्र्यांना मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी एका प्राणीमित्राने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियम १९६० चे कलम ११ (जी) (टी) प्रमाणे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
या कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांना विषप्रयोग करून कुत्र्यांना मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे प्राणीमित्र संतप्त असून सनिल उदय डोंगरे या प्राणीमित्राने याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत असं म्हटले आहे की, बुधवारी एका ठिकाणी त्यांना कुत्रा मेल्याचे दिसून आले. त्यानंतर पुढे जाऊन पाहिलं असता त्यांना आणखी काही कुत्री मरुन पडल्याचं दिसलं.
शहरातील आरोग्य मंदिर, मजगाव रोड, गोडबोले स्टॉप, पटवर्धन वाडी आदी परिसरात शोध घेतला असता २१ मोकाट कुत्र्यांच्या मृत्यू झाल्याचे प्राणीमित्र सनिल डोंगरे यांना दिसून आले. या कुत्र्यांना खाण्यासाठी चिकन भात ठेवलेला दिसून आला. याबाबत सनिल डोंगरे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. कुणीतरी अज्ञाताने कुत्र्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये कोणतेतरी विषारी औषध टाकून ते कुत्र्यांना खाण्यास दिल्याचं डोंगरे यांनी तक्रारीत म्हटलंय. याचसोबत आणखी सुमारे ३० कुत्रे बेपत्ता असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली आहे.
पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेऊन याचा तपास सुरु केला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत या कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. रासायनिक परिक्षणानंतर नेमके कोणते विष या कुत्र्यांना घातले ते स्पष्ट होईल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शवविच्छेदनानंतर या कुत्र्यांची पुरुन विल्हेवाट लावण्यात आली आहे. या प्रकारामुळे सध्या परिसराच चर्चांना उधाण आलंय.
ADVERTISEMENT