नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याची थेट टीका केली आहे. ‘मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती’, असे मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. कारवाई न करणे हे दुर्बलतेचे लक्षण असल्याचेही त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
ADVERTISEMENT
मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘जेव्हा एखाद्या देशाला (पाकिस्तान) निष्पाप लोकांच्या हत्येचा पश्चाताप होत नाही, तेव्हा संयम हे ताकदीचे लक्षण नसून दुर्बलतेचे लक्षण आहे. 26/11 ही वेळ होती जेव्हा शाब्दिक प्रहार करण्याऐवजी थेट कारवाई करण्याची गरज होती.’ मनिष तिवारी यांनी मुंबई हल्ल्याची तुलना ही अमेरिकेतील 9/11शी केली आणि भारताने त्यावेळी तात्काळ प्रत्युत्तर दिले पाहिजे होते. असंही म्हटलं आहे.
मनीष तिवारी यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पंजाबमधील राजकीय अस्थिरतेबाबत ते म्हणाले होते की, ‘ज्यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांना ते समजत नाही.’ याशिवाय कन्हैया कुमारच्या काँग्रेस प्रवेशावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकात जे म्हटलं आहे त्यावरुन आता भाजपनेही काँग्रेसला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले आहे की, ‘मनीष तिवारी यांनी 26/11 नंतर यूपीए सरकारच्या कमकुवतपणावर योग्य टीका केली आहे. एअर चीफ मार्शल फली मेजर यांनी असेही म्हटले होते की, या हल्ल्यानंतर हवाई दलाला कारवाई करायची होती, परंतु यूपीए सरकारने परवानगी दिली नाही.’ पूनावाला यांनी आरोप केला की, ‘काँग्रेस त्यावेळी 26/11 साठी हिंदूंना दोषी ठरवण्यात आणि पाकिस्तानला वाचवण्यात व्यस्त होती.’
पूनावाला यांनी असेही लिहिले की, ‘हिंदुत्व, 370 आणि सर्जिकल स्ट्राईकवर राहुल गांधी आणि काँग्रेस हे सतत पाकिस्तानची भाषा बोलतात. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे प्रत्युत्तरा दाखल कारवाई झाली तशीच कारवाई 26/11 नंतर करण्यापासून काँग्रेसला कोणी रोखले आणि का थांबवले, हे आता काँग्रेसने सांगितले पाहिजे.’ असेही ते म्हणाले.
Lt Nitika Kaul: सैन्यात अधिकारी बनली शहीद मेजरची पत्नी, पुलवामा चकमकीत पतीने गमावलेले प्राण
मुंबईत 26/11 च्या दिवशी काय घडलं होतं?
26 नोव्हेंबर 2008 च्या संध्याकाळी पाकिस्तानचे 10 दहशतवादी भारतात घुसले. दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला होता. दहशतवाद्यांनी रेल्वे स्टेशन, हॉटेल, बार, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आदी ठिकाणांना लक्ष्य केले होते.
26 नोव्हेंबरच्या रात्री 9.43 वाजता सुरू झालेला दहशतवादी हल्ला हा 29 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता संपला. दहशतवाद्यांचा हा नंगा नाच तब्बल 60 तास मुंबईच्या रस्त्यावर सुरु होता. या हल्ल्यांमध्ये तब्बल 166 लोकांचा हकनाक बळी गेला होता. या चकमकीत 9 दहशतवादी मारले गेले होते. तर जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस, एटीएस आणि एनएसजीचे मिळून एकूण 11 जवान शहीद झाले होते.
ADVERTISEMENT