मुंबई-पुणे महामार्गावर आज खोपोलीच्या हद्दीत बोरघाट उतरत असताना सहा वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात तिघं जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील तिघांचा तर तुळजापूरमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
पहाटेच्या सुमारास महामार्गावर खोपोली एक्झीट जवळ मुंबईकडे जाताना MH 46 AR 3877 या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने पुढे जाणा-या MH 13 BN 7122 या स्वीफ्ट कारला धडक दिली. या धडकेत कारमधील चौघांनाही आपले प्राण गमवावे लागले. कंटेनरच्या धडकेमुळे स्वीफ्ट कारने MH 10 AW 7611 या पुढे जणा-या आयशर टेम्पो धडक दिली, टेम्पोने पुढे जाणा-या MH 21 BO 5281 या कारला जोरदार धडक दिली. ज्यातील तीन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचं कळतंय.
अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावं गौरव खरात, सौरभ तुळसे, सिद्धार्थ राजगुरु, मयूर कदम अशी आहेत. याशिवाय जालना जिल्ह्यातील पवन अग्रवाल, मितेश वडोदे आणि अस्लम शेख या तीन तरुणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सदर अपघाताची माहीती कळताच आय .आर. बी यत्रंणा, महामार्ग वाहतुक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स यांनी घटनास्थळी पोहचुन मदतकार्य सुरु केलं. या अपघातात दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचुर झाला होता. या दोन्ही कार रस्त्याच्या बाजुला करुन महामार्ग मोकळा करण्यात आला.
ADVERTISEMENT