पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील खोपी गावात नवगुरू संस्थानच्या ४८ विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट नसले तरी सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. यातील बहुतांश मुली या परराज्यातील आहेत. त्या शिक्षणासाठी या संस्थेत आल्या आहेत. या सर्व मुली नवगुरू संस्थेत सॉफ्टवेअर व्यावसायिक म्हणून प्रशिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
ADVERTISEMENT
विषबाधा झालेल्या ४८ विद्यार्थींनींपैकी २२ विद्यार्थीनींवर भोर उपजिल्हा रुग्णालयात तर २० मुलींवर नसरापूर आरोग्य उपकेंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित सहा विद्यार्थ्यांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या मुलींना अन्नातून विषबाधा होण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने पाणी आणि अन्नाचे नमुने घेतले आहेत. या मुली संस्थेच्या जवळ असलेल्या वसतीगृहात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री जेवण केल्यानंतर यातील चार-पाच मुलींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. मंगळवारी यापैकी अनेक विद्यार्थिनींना हा त्रास वाढल्याने त्यांना नसरापूर येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. या सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनंत साबणे यांनी दिली.
ADVERTISEMENT