मुंबई: आज आणि उद्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. आज पहिला दिवस पार पडला, यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन होते. आजच्या अधिवेशन सत्रात अनेक रंजक गोष्टी घडल्या.
ADVERTISEMENT
1) सभागृहात उद्धव ठाकरे सेना विरुद्ध एकनाथ शिंदे सेना
आज सभागृहात उद्धव ठाकरे सेना विरुद्ध एकनाथ शिंदे सेना समोरा-समोर आली होती. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षातील ३९ आमदारांनी व्हीप नाकारत मतदान केल्याचा आरोप केला तर एकनाथ शिंदे गटातील दीपक केसरकर यांनीही आमचा व्हीप नाकारल्याचा आरोप केला. त्यामुळे आज सभागृहात कुठेतरी उद्धव ठाकरे सेना विरुद्ध एकनाथ शिंदे सेना पाहायला मिळाली. सध्या ही लढाई कोर्टामध्ये आहे, आणि याचा निकाल ११ जुलै रोजी लागणार आहे.
2) देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांची सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून आज निवड करण्यात आली. नार्वेकर हे राज्यातीलच नाही तर देशातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत. एवढेच नाहीतर राहुल नार्वेकरांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे सभागृहात सासरे-जावई अशी जोडी पाहायला मिळणार आहे. आज सभागृहात देखील अनेक नेत्यांनी या नात्यावरुन आपली मतं व्यक्त केली आहेत. अजित पवार, जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांची फटकेबाजी पाहायला मिळाली.
3) देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाकावर, विरोधकांचे टोमणे
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या बाकावर बसले होते. पत्रकार परिषद घेऊन स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आणि सर्वांना धक्का बसला. ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. त्यामुळे आज सभागृहात विरोधकांनी फडणवीसांना टोमणे मारले. कारण एकनाथ शिंदे पहिल्या बाकावर आणि देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाकावर बसले होते.
4) शिवसेना पक्ष कार्यालय सील करण्यात आलं?
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट सध्या पडले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने आज विधीमंडळातील पक्ष कार्यालय सील करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादामुळे हे कार्यलय सील करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
5) कुठल्या शिवसेनेचा व्हीप लागू होणार?
शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाने आपला प्रतोद निवडला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुनील प्रभू यांना प्रतोद नेमले आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भरत गोगावले यांची निवड झाली आहे. आता कुठल्या शिवसेनेचा व्हीप लागू होणार हे उद्या समजणार आहे. याबाबत ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हे लवकरच स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT