Shivsena : ठाण्यात सेनेला मोठा धक्का, ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात

मुस्तफा शेख

• 01:10 PM • 07 Jul 2022

शिवसेनेत बंड झाल्यानंतर भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना ठाण्यात आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे माझे खणखणीत नाणे असं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणायचे. मात्र याच ठाण्यातल्या ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेत बंड झाल्यानंतर भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना ठाण्यात आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे माझे खणखणीत नाणे असं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणायचे. मात्र याच ठाण्यातल्या ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

हे वाचलं का?

‘धर्मवीर’मधल्या नथुराम गोडसेचा कात्री लावलेल्या सीनसह काय होते एकनाथ शिंदेंच्या बंडाचे संकेत?

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावर मजबूत पकड आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याकडून मिळालेली ठाण्याची सूत्रं ही एकनाथ शिंदे यांनी आपल्या हाती घेतली. ठाणे महापालिकेत काही दशकांपासून शिवसेनेची अबाधित सत्ता आहे. आता महापालिका निवडणुकीच्या आधीच ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे गट आपलासा केल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, कुणाला कुठलं खातं मिळू शकतं?

शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे त्यामुळे शिवसेना दुभंगली आहे. अशात शिवसेना फुटू नये याची काळजी उद्धव ठाकरे घेत आहेत. नव्याने पक्ष बांधणीलाही लागले आहेत. या सगळ्या समस्येत उद्धव ठाकरेंना हा धक्का मिळाला आहे. ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे.

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर माजी नगरसेवकही शिंदे गटाकडे वळल्याने उद्धव ठाकरेंची चिंता वाढली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काँग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची शिवसेनेच्या लोकसभा प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी ही घोषणा करण्यात आली होती. त्याआधी भावना गवळी या शिवसेनेच्या लोकसभा प्रतोद होत्या. मात्र त्यांनी शिंदे गटाला अनुकूल भूमिका घेतल्याने त्यांच्यानंतर राजन विचारे यांची नियुक्ती प्रतोदपदी करण्यात आली आहे.

    follow whatsapp