महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजार 799 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 61 लाख 10 हजार 124 इतकी झाली. ज्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता 96.66 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 6 हजार 55 नवे रूग्ण आढळले आहेत. 177 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोना मृत्यू दर 2.1 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 कोटी 85 लाख 32 हजार 523 नमुन्यांपैकी 63 लाख 21 हजार 68 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 4 लाख 51 हजार 971 रूग्ण होम क्वारंटाईन आहेत तर 3009 रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 74 हजार 318 सक्रिय रूग्ण आहेत.
महाराष्ट्रातल्या 23 जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चेन अंतर्गतचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मॉल, दुकानं, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं हे सगळं या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान आजच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातल्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत म्हणून चिंता व्यक्त केली आहे. 11 जिल्ह्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध कायम राहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये गरज पडल्यास निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. एकीकडे महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तसंच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी दोन रूग्ण वाढले आहेत. एवढंच नाही तर झिका व्हायरसचाही एक रूग्ण आढळला आहे. दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसते आहे तरीही राज्य सरकारने शिथील केले आहेत. मात्र कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे राज्य सरकारने बंधनकारक केलं आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम घालूनच हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
काय म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयाने?
आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे सांगितलं आहे की देशभरात असे 18 जिल्हे आहेत जिथे कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. यापैकी 10 जिल्हे एकट्या केरळमधले आहेत. तर महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांचा या 18 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी सांगितलं की देशातल्या 57 जिल्ह्यांमध्ये रोज 100 रूग्ण आढळत आहेत. तर देशातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे की, केरळमधले 10 जिल्हे, महाराष्ट्रातील 3, मणिपूरमधले 2, अरूणाचल, मेघालय आणि मिझोरमच्या प्रत्येकी एक-एक जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसरी लाट अद्याप संपलेली नाही असंही वक्तव्य लव अग्रवाल यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT