दुर्दैवी ! जनरेटरच्या धुरामुळे श्वास कोंडून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

मुंबई तक

• 05:15 AM • 13 Jul 2021

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात दर्यापूर परिसरात एकाच कुटुंबातील सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जनरेटरच्या धुरामुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री लाईट गेल्यामुळे घरात जनरेटर आणून परिवारातले सदस्य झोपायला गेले. परंतू यावेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जनरेटरमधून धुर यायला सुरुवात झाली, ज्यात […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात दर्यापूर परिसरात एकाच कुटुंबातील सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जनरेटरच्या धुरामुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री लाईट गेल्यामुळे घरात जनरेटर आणून परिवारातले सदस्य झोपायला गेले. परंतू यावेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जनरेटरमधून धुर यायला सुरुवात झाली, ज्यात घरातील सहा जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

हे वाचलं का?

दर्यापूर कुटुंबात राहत असलेल्या लष्कर कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ दिवसांपूर्वीच लष्कर कुटुंबात एका विवाह सोहळा पार पडला होता. या घटनेत नवदाम्पत्यालाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. अवघ्या १५ दिवसांच्या संसाराचा शेवट अशा विदारक पद्धतीने झाल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

या परिसरात वीज गेल्यामुळे रात्री जनरेटर लावून लष्कर कुटुंब झोपून गेलं. बाहेर पाऊस असल्यामुळे लष्कर यांनी जनरेटर घरातच ठेवला. हीच चूक त्यांना नंतर महागात पडली. गाढ झोपत असताना घरात मोठ्या प्रमाणात धूर तयार झाल्यामुळे सात जणांचा श्वास कोंडला गेला. बराच वेळ झाला तरीही दार उघडण्यात आलं नाही म्हणून शेजारच्या व्यक्तींनी दार उघडलं असता हा प्रकार समोर आला.

यावेळी दरवाजा उघडला असता सातही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर शेजारच्यांनी सर्वांना रुग्णालयात भरती केलं असता डॉक्टरांनी सहा जणांना जागेवर मृत घोषित केलं. तर एका रुग्णाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांनी आपले प्राण गमावले असून दासु लष्कर (४०) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

लष्कर कुटुंबात 15 दिवसांपूर्वी अजय आणि माधुरी चा विवाह सोहळा पार पडला होता, आणि कालच म्हणजे सोमवारी अजय ने माहेरी गेलेल्या माधुरीला परत घरी आणले होते. परंतू अवघ्या १५ दिवसांत या नवदाम्पत्याचा संसार दुर्दैवी पद्धतीने संपल्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp