महाराष्ट्राचं टेन्शन वाढणार असं चित्र आजच्या कोरोना रूग्णांच्या संख्येनं दाखवलं आहे. कारण दिवसभरात ९ हजार ८५५ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना रूग्णांची ही संख्या मागचे दोन दिवस ७ हजार किंवा त्याच्या आत होती. आज दहा हजाराच्या आसपास जाणारी नव्या रूग्णांची संख्या समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना पुन्हा हात-पाय पसरत असल्याचं दिसून येतं आहे. आज राज्यात ६ हजार ५५९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख ४३ हजार ३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात आज ४२ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा आज घडीला २.४० टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ७९ हजार १८५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
महाराष्ट्रात आज घडीला ८२ हजार ३४३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज नोंद झालेल्या ४२ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ७ मृत्यू मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ३ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू नागपूर २ आणि उस्मानाबाद १ असे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई – ८ हजार ५९४
ठाणे – ८ हजार ८१०
पुणे – १६ हजार ४९१
नाशिक- २ हजार ६८१
औरंगाबाद – २ हजार ९५१
नागपूर – १० हजार १३२
अमरावती – ५ हजार ८९६
अकोला – ३ हजार ९१५
वाशिम – १ हजार ४९५
महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांचा विचार केला तर पुणे आणि नागपूर या दोन्ही शहरांमध्ये अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे.
ADVERTISEMENT