प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातल्या सिधी या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. ही बस सिधीहून सतना या ठिकाणी जात होती. त्यावेळीच हा अपघात घडला.
ADVERTISEMENT
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आत्तापर्यंत 35 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. तर सात जणांना वाचवण्यत यश आलं आहे. इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे.
हा अपघात घडला त्यानंतर तातडीने जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघात झालेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. बस दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मृतांच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेश सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या घटनेबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही अतीव दुःख व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले शिवराज सिंग चौहान?
सीधी जिल्ह्यात झालेला अपघात ही एक दुर्दैवी घटना आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जिल्हाधिकारी, पोलीस कमिश्नर, आयजी, एसपी, एसडीआरएफ या सगळ्यांची पथकं त्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
ADVERTISEMENT