आदित्य ठाकरे रोज शिंदे गटातील ४० आमदारांवर बरसत आहेत. खोक्यांचे आरोप करत आहेत. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याचं आव्हान देत आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानाला अब्दुल सत्तारांकडून जशास तसं उत्तर मिळत आहे.सत्तारांनी आमदारकीवर पाणी सोडण्याची तयारी दाखवली. एवढंच नाही, तर कधीकाळी नेता मानलेल्या आदित्य ठाकरेंची सत्तारांनी दुसरे पप्पूही म्हटलं. दोघांमधे जोरदार कलगीतुरा रंगलेला असतानाच आता ठाकरे थेट सत्तारांच्या बालेकिल्यात शिरण्याच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे सध्या सत्तारांशी पंगा घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. ठाकरेंनी सत्तारांशी पंगा का घेतला, यातून का साधलं जाणार आहे, आणि सिल्लोडमध्ये बाहुबली टाईप प्रतिमा असलेले सत्तार अडचणीत येऊ शकतात का? असं प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत.
आदित्य ठाकरे विरद्ध अब्दुल सत्तारांमध्ये वादाची ठिणगी कशी पडली?
चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. पहिल्यांदाच ठाकरेंच्या गादीला आणि मातोश्रीला थेट आव्हान मिळालं. त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरेंना बंडानंतर थेट रस्त्यावरून उतरून चार हात करावे लागत आहेत. मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी राज्यभरात नव्यानं संघटनात्मक जुळवाजुळव सुरू केलीये. तर आदित्य ठाकरेंनी बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून दौरे सुरू केलेत.
मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, तर आठवडाभरात माझी बातमी दिसेल, ठाकरेंना सत्तारांचं चॅलेंज
आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचाही दौरा केला, पण ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड मतदारसंघात जाणं टाळलं. तेव्हा सत्तारांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवा म्हणत ठाकरेंना डिवचलं होतं. आता दोनेक महिन्यांनी ठाकरेंचा पुन्हा औरंगाबाद दौरा ठरलाय आणि यावेळी ते थेट सत्तारांच्या बालेकिल्ल्यात धडक देणार आहेत.
ठाकरेंसमोर सिल्लोडचं आव्हान? काय आहेत कारणं?
येत्या ७ नोव्हेंबरला सिल्लोड आणि पैठणमध्ये शिवसंवाद यात्रा धडकणार आहे. पण ठाकरेंसाठी सिल्लोड मोहीम म्हणजे अडचणींचा डोंगर असल्याचं म्हटलं जातंय. असं का म्हणण्यामागं दोन प्रमुख कारणं सांगितली जातात. पहिलं कारण म्हणजे, औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण सिल्लोड हा काही शिवसेनेचा बालेकिल्ला नाही.
आतापर्यंत ठाकरेंच्या सभा झाल्या, तिथं शिवसेनेच्या वर्षानुवर्षांपासून प्रभाव राहिलाय. सिल्लोडमध्ये शिवसेनेचा प्रभाव नाममात्र आहे.
दुसरं कारण म्हणजे, सिल्लोडमध्ये गेल्या पंचवीसेक वर्षांपासून सत्तारांचाच प्रभाव राहिलाय. आणि हा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोय. जवळपास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तारांचा प्रभाव राहिलाय. मग सत्तार अपक्ष असो काँग्रेसमध्ये असो की शिवसेनेत. सातत्यानं ते जिंकत आलेत. त्यामुळे बंडखोरांना पराभूत करण्याचं ठाकरेंचं आव्हान सिल्लोडमध्ये प्रत्यक्षात येणं सहजासहजी शक्य नाही, असं स्थानिक राजकारणाचा अभ्यास असलेल्यांचं म्हणणं आहे.
मग आता प्रश्न निर्माण होतो, ठाकरे अडचणींचा हा डोंगर का चढत आहेत. जाणकारांच्या मते, शिंदे गटातून ठाकरेंवर एकेरी भाषेत आणि थेट हल्ला चढवला जातोय, तो अब्दुल सत्तारांकडून. त्याला उत्तर म्हणून ठाकरेंची ही चढाई आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आदित्य ठाकरेंच्या सभेला महाराष्ट्रभर गर्दी होतेय आणि त्याची खूप चर्चाही होतेय. सत्तारांच्या बालेकिल्ल्यातही अशीच सभा घेऊन जिथं शिवसेनेचा प्रभाव नाही, तिथेही बंडामुळे ताकद निर्माण झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होईल, अशी चर्चा सुरू झालीये.
आदित्य ठाकरेंचा दौरा अब्दुल सत्तारांसाठी अडचणीचा ठरू शकतो?
आता जर खरंच ठाकरेंच्या सिल्लोड दौऱ्याला आतापर्यंतच्या दौऱ्यांसारखा प्रतिसाद मिळाला, तर मात्र ती गोष्ट अब्दुल सत्तारांसाठी अडचणीची ठरू शकते. ही गर्दी म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तारांविरुद्ध तयार झालेली लाट आहे, असं दाखवलं जाईल. यातूनच २०२४ साठीचे आडाखे बांधले जातील. त्यामुळे सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात काय होतं, किती प्रतिसाद मिळतो आणि सिल्लोडमध्ये सभा घेऊन ती गाजवण्याची आयडिया माहीत असलेले सत्तार ठाकरेंविरुद्ध काय खेळी करतात हे बघावं लागेल.
ADVERTISEMENT