काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज निलंबित खासदारांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हे त्या ठिकाणी होते. राहुल गांधी आल्याचं बघताच आप आये बहार आयी असं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यांचा तो क्षण कॅमेरात कैद झाला आहे. राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी संसदेतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आले होते.
ADVERTISEMENT
काय घडलं?
राहुल गांधी हे जेव्हा बारा निलंबित खासदारांच्या आंदोलन स्थळी आले त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं. तसंच ते खासदारांजवळ त्यांना घेऊन जात असतानाच आप आये बहार आयी हे शब्द उच्चारले. या संबंधीचा व्हीडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
याच महिन्याच्या सुरूवातीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसंच प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींनाही ते भेटले होते. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जवळीक वाढते आहे अशी चर्चा सुरू झाली. भाजपच्या विरोधात जर तिसरी आघाडी उभी करायची असेल किंवा एक सक्षम पर्याय उभा करायचा असेल तर तो काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय केवळ अशक्य आहे. मी त्याच कारणासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींना भेटलो होतो असं संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं होतं.
ममता बॅनर्जी या जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या तेव्हा युपीए कुठे दिसत नाही असं म्हणाल्या होत्या. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं होतं. की ममता बॅनर्जी यांचं ते मत असू शकतं. मात्र भाजपला सत्तेपासून वेगळं ठेवायचं असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं सरकार आहे. त्याच धर्तीवर देशात प्रयोग केला तर तो यशस्वी होऊ शकतो असंही संजय राऊत यांनी अनेकदा म्हटलं आहे.
ADVERTISEMENT