‘केंद्रीय यंत्रणांना आलेलल्या नैराश्यातून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. आम्हाला या गोष्टीची यत्किचितही चिंता वाटत नाही’ असं म्हणत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ED ने मुंबई आणि नागपूर या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी केली. त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यातमध्ये नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यालयात सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले शरद पवार?
ED वगैरे आम्हाला काही नवीन नाही. अनिल देशमुख हे काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी घालून दिला आहे. त्याची आम्हाला अजिबात चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांनी आधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना हाती काय लागलं हे मला माहिती नाही. माझ्या मते हाती काहीही लागलं नाही. त्याचमुळे जे नैराश्य आलं आहे त्या नैराश्यातून आणखी काही त्रास देता येईल का? हाच आत्ताचा यंत्रणांचा प्रयत्न दिसतो आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काहीही कारण नाही.
‘अनिल देशमुख-अनिल परब ही तर प्यादी, खरे सूत्रधार सिल्वर ओक आणि वर्षावर बसलेत !’
जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपून टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी या प्रकारचा यंत्रणा वापरून घ्यायच्या. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रानेही असं काही पाहिली नव्हतं. केंद्राची सत्ता हाती आल्यानंतर आपण या सगळ्य गोष्टी बघायला लागलो. मला वाटतं याचा काहीही परिणाम होणार नाही. लोक त्याची गांभीर्याने नोंद घेत नाहीत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत. त्याबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले की प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल आमची काहीही तक्रार नाही. आपल्या कार्यकर्त्यांची उमेद वाढावी यासाठी आम्ही सगळेच बोलत असतो. त्यासाठी काँग्रेस असे काही प्रयत्न करत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. हा प्रयत्न त्यांनी अवश्य करावा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT